Ajit Pawar : अजित पवार मुख्यमंत्री होणार का? अजितदादांनी सांगितले गणित
Ajit Pawar Pune : राज्यात अनेक नेत्यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा केला जातो. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचाही समावेश आहे. आता यासंदर्भात अजित पवार यांनीच गणित मांडत उत्तर दिले आहे...
पुणे | 10 सप्टेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंड पुकारत भाजप-शिवसेना युतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. अजित पवार यांचे समर्थक अनेकवेळा त्यांना भावी मुख्यमंत्री म्हणतात. अजित पवार भावी मुख्यमंत्री असे बॅनरही अनेक ठिकाणी झळकतात. विरोधकांकडूनही एकनाथ शिंदे काही दिवसांचे मुख्यमंत्री असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे अजित पवार मुख्यमंत्री होणार का? हा विषय सतत चर्चेला असतो. आता पुणे शहरात माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी यावर स्पष्टच सर्व काही सांगितले.
पुणे शहरात समर्थकांकडून बॅनरबाजी
पुणे शहरात अजित पवार समर्थक माजी नगरसेवक प्रमोद निम्हण यांच्याकडून बॅनरबाजी केली गेली आहे. हक्क मागून मिळत नाही, हक्कासाठी लढावं लागत…महाराष्ट्राचे लाडके दादा. पुण्यनगरीत आपले सहर्ष स्वागत, असे बॅनरवर लिहिले आहे. या बॅनरची चांगलीच चर्चा पुणे शहरात रंगली आहे. यापूर्वी पुणे शहरात अजित पवार भावी मुख्यमंत्री असे बॅनर लागले होते.
काय म्हणाले अजित पवार
राज्याचे मुख्यमंत्री होणार का? याविषयावर अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले. पुण्यात माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, भावी मुख्यमंत्री असे बॅनर लावून काही होत नाही. मुख्यमंत्री होण्यासाठी १४५ ची मॅजिक फिगर गाठावी लागते. ही वेळ कधी येईल सांगता येत नाही. त्यामुळे आपण आपले काम करत राहावे, असे त्यांनी सांगत या विषयावरील सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. पुणे शहरात अजित पवार यांनी रोड शो करत शक्तीप्रदर्शनही केले.
अजित पवार यांची आज कोल्हापुरात सभा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रविवारी कोल्हापुरात सभा होणार आहे. शरद पवार यांच्या झालेल्या सभेला उत्तर देणारी ही सभा असणार आहे. कोल्हापूरच्या तपोवन मैदानात होणाऱ्या सभेची तयारी पूर्ण झाली आहे. उत्तरदायित्व सभेच्या निमित्ताने हसन मुश्रीफ जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहे. कोल्हापूर शहरात सर्वत्र अजित पवार गटाचे बॅनर लागले आहेत. तसेच सभेच्या तयारीसाठी अजित पवार गटाच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक झाली.