सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे विरुद्ध अजित पवार मैदानात? काय आहे राष्ट्रवादीचा प्लॅन B
NCP convention in Karjat Ajit Pawar | मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. यापूर्वी विविध राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. अजित पवार गट निवडणुकीच्या तयारीस लागले आहे. या निवडणुकीत बारामती आणि शिरुर लोकसभा अजित पवार गट लढवणार आहे.
कर्जत, पुणे | 1 डिसेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर अजित पवार यांनी वेगळा गट तयार केला. शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी असा सामना सध्या निवडणूक आयोगात सुरु आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची? याचा निर्णय होणार आहे. निवडणूक आयोगात झालेल्या सुनावणीत अजित पवार यांच्यासंदर्भात भेकड शब्द शरद पवार गटाकडून वापरला गेला. त्यावर गुरुवारी सुनील तटकरे यांच्याकडून खंत व्यक्त करण्यात आली. आता सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे विरुद्ध अजित पवार मैदानात उतरणार आहे. अजित पवार यांनी लोकसभेच्या जागा लढवण्याची घोषणा केली. त्यात बारामती आणि शिरुर लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे. यामुळे शरद पवार गटातील खासदार अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार यांची राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे.
बारामती लढवणार…उमेदवार कोण?
बारामती लोकसभा मतदार संघात २००९ पासून सुप्रिया सुळे निवडणूक लढवत आहे. सलग तीन वेळा त्या विजयी झाल्या आहेत. त्यापूर्वी १९९१ पासून ते २००९ पर्यंत शरद पवार यांना मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले. यामुळे हा मतदार संघ पवार कुटुंबियांकडेच राहिला. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर अजित पवार यांनी वेगळी चूल मांडली. त्यांनी आता बारामती लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला. महायुतीकडून बारामतीची जागा आपणासच मिळणार असून आपण ती लढवणार असल्याचे अजित पवार यांनी पक्षाच्या शिबिरात कर्जतमध्ये बोलताना शुक्रवारी सांगितले. आता बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचा उमदेवार कोण असणार? अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उमेदवार असणार की अन्य कोण? हे काही महिन्यांत स्पष्ट होणार आहे.
शिरुरमध्ये रंगणार सामना
शिरुरमध्ये शरद पवार गटाचे अमोल कोल्हे खासदार आहे. शिरुर लोकसभा मतदार संघावर अजित पवार यांचे वर्चस्व आहे. अमोल कोल्हे यांनी २०१९ मध्ये शिवसेनेचे शिवाजी आढळराव पाटील यांचा पराभव केला होता. आता ही जागाही अजित पवार गट लढवणार आहे. यामुळे अमोल कोल्हे यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहणार आहे. अजित पवार या मतदार संघातून कोणाला उमदेवारी देणार? हे काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.