Ajit Pawar : सरळ देत नसतील तर बोट वाकडं करावं लागतं, टनामागे 10 रुपये देण्यावरून अजित पवारांचा कारखान्यांना इशारा
अजित पवारांनी (Ajit Pawar) बोलताना साखर कारखान्यांना (Sugar Factory) कडकडीत इशारा दिला आहे. जर कोणत्या साखर कारखान्याने ऊसतोड कामगारांच्या निधीसाठी टनामागे 10 रुपये दिले नाही, तर पुढच्या वर्षी त्याच्या कारखान्याला ऊस जाणार नाही, असे अजित पवारांनी स्पष्ट केले आहे.
पुणे : पुण्यात आज लोकनेते गोपीनाथराव मुंडे (Gopinath Munde) ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या (Sugarcane Workers Welfare Corporation) मुख्य कार्यालयाचे उद्धाघटन करण्यात आलं. यावेळी अजित पवारांनी (Ajit Pawar) बोलताना साखर कारखान्यांना (Sugar Factory) कडकडीत इशारा दिला आहे. जर कोणत्या साखर कारखान्याने ऊसतोड कामगारांच्या निधीसाठी टनामागे 10 रुपये दिले नाही, तर पुढच्या वर्षी त्याच्या कारखान्याला ऊस जाणार नाही, असे अजित पवारांनी स्पष्ट केले आहे, तसेच सरळ देत नसतील तर बोट वाकड करावं लागतं, असा खोचक टोलाही अजित पवारंनी लगावला आहे. ऊसतोड कामगारांचा जीवावर मोठे होता आणि त्यांच्यांसाठी टनामागे 10 रुपये द्यायला नाही म्हणता, काही तरी वाटलं पाहिजे, सगळं इथेच सोडून जायचं आहे, असे म्हणत अजित पवारांनी कारखानदारांना आरसा दाखवला आहे. त्यामुळे आता साखर कारखानदार काय भूमिका घेणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अजित पवारांचा भाजपला अप्रत्यक्ष टोला
ऊसतोड कामगारांबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, ऊसतोड कामगारांच्या बाबतीत अनेक वर्षे अभ्यास झाला. पण 20 वर्षे कोणाला काही करता आलं नाही. पण मविआने हे महामंडळ अस्तित्वात आणलं, असे म्हणत त्यांनी भाजपलाही टोला लगावला आहे. तसेच हे लोक किती कष्ट घेतात हे ज्याचं त्याला माहिती. प्रतिकूल परिस्थितीत ही सगळी लोक काबाडकष्ट करतात, त्यातून साखर कारखान्यांना ऊस पुरवतात. ऊसतोड कामगाराचा मुलगा सामाजिक न्यायमंत्री झालाय हे भाग्य आहे. असे भाग्य ठराविक जणांना मिळत, असे म्हणत त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचं कौतुकही केले आहे.
अजून किती दिवस ऊस तोडायचा?
राज्यात 9 ते 10 लाख ऊसतोड कामगार आहेत. त्याच्या शिक्षण आरोग्य, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. गर्भायश काढण्याच्या घटना घडत आहेत. महामंडळाच्या मार्फत आता ऊसतोड कामगारांना ओळख मिळायला हवी. तात्पुरती घरी कशी देता येतील, पेंशन देता कशी येईल यावर विचार करावा लागेल. ऊसतोडणी करता आधुनिक साधन देणं, या साधनांच्या निर्मितीचा विचार करावा लागेल. ऊसतोड कामगारांची सावकारांकडून मोठी आर्थिक पिळवून होत असल्याचं लक्षात आलं आहे. आता ऊसतोड कामगार ही पद्धतच बंद झाली पाहिजे असं वाटतं, असेही अजित पवार म्हणाले. ऊस तोडणीसाठी नवीन नवीन टेक्नॉलॉजी आली आहे. किती वर्षे या लोकांनी ऊसच तोडायचा? आपल्याला इतके दिवस मोठ्या प्रमाणावर वापरून घेतलं, जे मिळायला हवं होतं ते मिळाले नाही. आता मात्र असं होणार नाही. तुमच्या कष्टाला न्याय देण्याच काम हे सरकार करेल, असा विश्वास यावेळी अजित पवारांनी ऊसतोड कामगारांना दिला.