बारामतीत सुप्रिया सुळेंविरोधात अजित पवार यांची पत्नी की हा चेहरा?
NCP Ajit Pawar | लोकसभेची निवडणुकीची आचारसंहिता मार्च महिन्यात लागण्याची शक्यता आहे. यापूर्वी विविध राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. अजित पवार गट निवडणुकीच्या तयारीस लागले आहे. अजित पवार यांनी बारामती निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला अन् चर्चा सुरु झाली.
पुणे | 2 डिसेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर अजित पवार यांनी वेगळा गट तयार केला. शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी असा सामना सध्या निवडणूक आयोगात सुरु आहे. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिवेशन कर्जतमध्ये झाले. या अधिवेशनात बारामतीची जागा लढवण्याचा निर्णय अजित पवार यांनी जाहीर केला. बारामतीत अजित पवार यांची बहिण सुप्रिया सुळे शरद पवार गटाकडून उमेदवार असणार आहे. मग अजित पवार गटाकडून कोण उमेदवार असणार? त्यावर चर्चा सुरु झाली आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव चर्चेत आले आहे. त्यामुळे बारामतीत नणंद भावजय एकमेकांविरोधात लढणार की काय? अशी शक्यता आहे. परंतु अजित पवार यांनी प्लॅन बी तयार केला आहे. त्यात भाजपचे दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांचे नाव आहे.
सुनेत्रा पवार यांची शक्यता कमी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडे महायुतीत बारामतीची जागा जाणार आहे. पुणे जिल्ह्यात वर्चस्व मिळवण्यासाठी बारामती आणि शिरुरमध्ये आपल्या गटाचे खासदार असणे गरजेचे असल्याचे मत अजित पवार यांचे आहे. बारामती लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना उतरवल्यास निवडून येण्याची शंभर टक्के खात्री नाही. दौंड, खडकवासला, इंदापूर भागात अजित पवार यांची ताकद कमी आहे. तसेच सुनेत्रा पवार यांना निवडणूक रिंगणात उतरल्यास नणंद भावजय समोरासमोर येतील. त्यामुळे नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. हे टाळण्यासाठी अजित पवार यांनी प्लॅन बी तयार केला आहे.
मग अजित पवार यांच्याकडे हा पर्याय
अजित पवार यांच्याकडे कांचन कुल यांचा पर्याय आहे. कांचन कुल भाजपमध्ये असल्या तरी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी देता येणार आहे. २०१९ च्या निवडणुकीत कांचन कुल यांनी सुप्रिया सुळे यांना चांगलीच लढत दिली होती. तसेच कांचन कुल यांना उमेदवारी दिल्यास भाजपकडून पूर्ण पाठबळ अजित पवार यांना मिळणार आहे. एकंदरीत भाजप आणि राष्ट्रवादी यांच्या एकत्रित ताकदीमुळे अजित पवार यांचा राष्ट्रवादीचा विजय सुकर होण्याची शक्यता आहे.