अरे बाळा तुझी चौकशी कधी… अजितदादा त्या प्रश्नावर उत्तर देताना भडकले; नेमकी प्रतिक्रिया काय?
बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. या प्रकरणात काही लोकांना अटक झाली असून, अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया देताना पत्रकारांवर संतप्त प्रतिक्रिया दिली. पोलिस चौकशी सुरू असून, सरकारने कुणालाही विशेष संरक्षण न दिल्याचेही स्पष्ट केले आहे.
बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात काही लोकांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित काही लोकांनाही खून आणि खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी राजीनामा देण्याची मागणी होत आहे. विरोधक आणि सत्ताधारी पक्षातील नेतेही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांना धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत विचारण्यात आलं. त्यावेळी अजित पवार थेट पत्रकारांवरच भडकले. तुझं नाव आल्याशिवाय कोणत्याही प्रकरणात तुझी चौकशी कशी होईल? असा सवाल अजित पवार यांनी भडकून केला आणि अधिक बोलण्यास नकार दिला.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांना धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत विचारण्यात आले. त्यावर ते पत्रकारांवरच भडकले. कितीदा तेच तेच सांगायचं. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल. अरे बाळा चौकशीला सामोरे गेलं… तुझी चौकशी कधी होईल? तुझं नाव आल्यावर होईल ना? तुझं नाव नसेल तर बळं बळं तुझी चौकशी करतील का रे? असा संतप्त सवाल अजित पवार यांनी केला आहे.
कुणालाही वेगळी ट्रीट नाही
जे कोणी दोषी असेल त्यावर कारवाई होईल, असं राज्याचे प्रमुख देवेंद्रजींनी सांगितलं आहे. आमचंही तेच म्हणणं आहे. त्यामुळे एखादी चौकशी करून काही झालं असतं तर गोष्ट वेगळी आहे. पण आता सीआयडी वेगळी चौकशी करत आहे. एसआयटी चौकशी करत आहे. न्यायालयीन चौकशी आहे ना बाबा. सरकारने कुणालाही वेगळं काही ट्रीट करायचं ठरवलं नाही. सर्वांना कायदा सारखा आहे, असंही पवार यांनी स्पष्ट केलं.
10 लाखांची मदत मिळाली
दरम्यान, भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आजही या प्रकरणावर भाष्य केलं आहे. आरोपींना अजूनही इकडच्या गुन्ह्यात वर्ग केलं नाही. सातही जणांवर मोक्का लावण्यात आला आहे. आकाही त्यात यावा ही आमची अपेक्षा आहे. त्याच्यावर मोक्का लागावा अशी आमची मागणी आहे, असं सुरेश धस म्हणाले. देशमुख कुटुंबीयांना सरकारने 10 लाख रुपयांची मदत दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात प्रत्येक गोष्ट केली आहे. संतोषला प्रत्येक गोष्टीच्या दृष्टीने न्याय मिळण्याचा प्रयत्न आम्ही करू, अशा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. संतोष देशमुख यांच्या पत्नीला सरकारी नोकरीत सामावून घेण्यात येणार आहे, अशी माहिती सुरेश धस यांनी दिली.
संरक्षणाची गरज नाही
मला व्यक्तिगत पोलीस संरक्षणाची गरज भासत नाही. जनता हेच माझ सर्वस्व आहे. आमचं बरं वाईट करायचं असेल तर कोणी कुठल्या पद्धतीनेही करू शकतो. अंजली दमानिया यांनी कुणाच्याही फोनला घाबरण्याचे कारण नाही. ज्यांचा फोन येईल त्यांच्याबाबत तक्रार दाखल करा, असा सल्ला त्यांनी दिला.
घात की अपघात शोध लागायचाय
दरम्यान, बीडमध्ये एका सरपंचाचा अपघाती मृत्यू झाला. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. काल रात्री 9.20 वाजता ही घटना घडली. बोगस आणि अवैध राखेची लूट परळी भागात चालू आहे याचा करिष्मा बघा. रात्री झालेली घटना घातपात की अपघात याचा शोध अजून लागायचा आहे. परळी विभागाची चर्चा महाराष्ट्रात सुरू असून सुद्धा राखेचे टिप्पर बंद नाहीत. या अवैद्य व्यवसायांना परळीचे पोलीस आणि थर्मल पॉवरचे अधिकारी आणि कर्मचारी याला जबाबदार आहे, असंही ते म्हणाले.