आंबिल ओढ्यातील तोडक कारवाईला न्यायालयाकडून स्थगिती, स्थानिकांना मोठा दिलासा
लोकांना उद्ध्वस्त करणं उचित ठरणार नाही, त्यामुळे या लोकांचं जोपर्यंत पुनर्वसन होणार नाही, तोपर्यंत पुणे महापालिकेच्या तोडकामाच्या कारवाईला स्थगिती देत आहोत. पुढील आदेशापर्यंत ही स्थगिती असेल.
पुणे : पुण्यातील आंबिल ओढा परिसरातील तोडक कारवाईला अखेर नायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. आंबिल ओढालगत असलेली घरं पाडण्याची कारवाई सकाळपासून सुरु होती. या कारवाईला स्थानिकांकडून मोठा विरोध सुरु होता. मात्र, पोलीस बळाचा वापर करत ओढा परिसरातील अनेक घरं पाडण्यात आली आहे. यावेळी पोलिस आणि स्थानिकांमध्ये मोठा वाद झाल्याचंही पाहायला मिळालं. काही स्थानिकांना अंगावर रॉकेल ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्नही केला. अशास्थितीत वकिलांनी स्थानिकांची बाजू कोर्टात मांडल्यानंतर कोर्टाकडून या तोडक कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे. बिल्डरच्या फायद्यासाठी आंबिल ओढ्याच्या नैसर्गिक प्रवाह बदलण्याचा घाट घातल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. (Pune court adjourns action to remove encroachment in Ambil Odha area )
न्यायालय नेमकं काय म्हणालं?
नागरिकांच्या विकलांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायालय म्हणाले, या लोकांना विस्थापित होणार आहे, त्यांचं पुनर्वसन करण्याचं कोणतंही रेकॉर्ड न्यायालयासमोर नाही, त्यामुळे लोकांना उद्ध्वस्त करणं उचित ठरणार नाही, त्यामुळे या लोकांचं जोपर्यंत पुनर्वसन होणार नाही, तोपर्यंत पुणे महापालिकेच्या तोडकामाच्या कारवाईला स्थगिती देत आहोत. पुढील आदेशापर्यंत ही स्थगिती असेल.
नेमकं प्रकरण काय?
पुण्यातील आंबिल ओढा परिसरात अतिक्रमण हटवण्याची कारवाईला सुरुवात करण्यात आली होती. या कारवाईदरम्यान स्थानिक आणि पोलिस प्रशासन आमने-सामने आले. या कारवाईला स्थानिकांनी विरोध केला. तसेच यावेळी आंदोलनादरम्यान आत्मदहनाचा प्रयत्न झाला. यावेळी स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेत मोठी गर्दी केली होती.
बिल्डरच्या फायद्यासाठी आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रवास बदलण्याचा घाट घालण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप आहे. त्यासाठी जबरदस्तीने आंबिल ओढ्यात असलेली घरे पाडण्याच्या कारवाईला सुरुवात करण्यात आली होती. यावेळी पोलिस आणि स्थानिकांमध्ये झटापटही पाहायला मिळाली. या कारवाईला आंबिल ओढ्यातील नागरिकांचा विरोध पाहायला मिळत आहे. यावेळी काहींनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला गेला. सध्या आंबिल ओढ्यात 700 ते 800 पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळाला.
तसंच भाडोत्री कामगार आणून लोकांच्या घरातील साहित्य बाहेर काढलं. पोलिसांनी विरोध करणाऱ्यांना उचलून नेलं आणि पाडकाम सुरु होतं. सध्या राजकीय नेते या कारवाईचा निषेध करत असले तरी राजकीय आदेशाशिवाय ही कारवाई होत नाही, हेच सत्य आहे असे स्थानिक नागरिक म्हणणे आहे.
संबंधित बातम्या :
पुण्याच्या आंबिल ओढ्यात राडा, घरं पाडण्यास स्थानिकांचा विरोध, काय आहे संपूर्ण वाद?
Pune court adjourns action to remove encroachment in Ambil Odha area