Amol Kolhe : कुणी काहीही म्हणो, सुप्रिया सुळेंचं काम बोलतं; अमोल कोल्हेंचा भाजपाला टोला
कुणी काहीही बोलले तरी काम बोलते. त्यामुळे फारसा फरक पडत नाही. जनता सूज्ञ आहे. मतदारांनी नेहमीच विश्वास दाखवला आहे, असे अमोल कोल्हे म्हणाले.
पुणे : 2024ला अजून खूप वेळ आहे. तोपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून जाणार आहे. खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)यांचे काम बोलते. त्यामुळे बारामतीला कुणीही आले तरी काही फरक पडत नाही, असे मत राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी व्यक्त केले आहे. गणपतीच्या आरतीनंतर टीव्ही 9ने त्यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी भाजपाला टोले लगावले. भाजपाने (BJP) बारामतीसाठीची तयारी करण्यास सुरुवात केली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्षदेखील आज बारामतीत दाखल होत राष्ट्रवादीवर टीका केली होती. त्यावर अमोल कोल्हे म्हणाले, की सुप्रिया सुळे या आमच्या खासदार आहेत. महासंसद पटूने त्यांचा गौरव करण्यात आला आहे. ताईंची संसदेतील कामगिरी आम्हा सर्वांना प्रेरणा देणारी आहे. कुणी काहीही बोलले तरी काम बोलते. त्यामुळे फारसा फरक पडत नाही. जनता सूज्ञ आहे. मतदारांनी नेहमीच विश्वास दाखवला आहे, असे ते म्हणाले.
‘महाराष्ट्राच्या दृष्टीने मुंबई महत्त्वाची’
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि या आर्थिक राजधानीच्या नाड्या आपल्या हातात राहाव्यात, असे प्रत्येक पक्षाला वाटते. त्यात भाजपाला वाटणेही स्वाभाविक आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने मुंबई अत्यंत महत्त्वाची आहे. येथील जनतेचे कल्याण व्हावे. त्यादृष्टीने कौलही महत्त्वाचा असेल, अशी प्रतिक्रिया अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावर त्यांनी दिली आहे.
‘राज्यासमोर सध्या अनेक प्रश्न’
राज्यासमोर सध्या अनेक प्रश्न आहे. राजकारणापेक्षा येथील प्रश्नांकडे अधिक लक्ष दिले तर जास्त चांगले होईल, असे ते म्हणाले. दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गटात सध्या सामना सुरू आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. दसरा मेळावा कुणाचा आणि कुठे होणार यावर सध्या वाद सुरू आहे. मात्र या सर्व बाबी न्यायालयात प्रलंबित आहेत. परवानगी मिळाली नाही, तर शिवसेना न्यायालयात जाणार आहे.
‘सक्षम लोकशाहीसाठी सक्षम विरोधक गरजेचा’
राज्यात अनेक ठिकाणी दुपार पेरणीचे संकट आहे, पीकविम्याचा प्रश्न आहे, कांदा उत्पादकांच्या समस्या आहेत. याला प्राधान्य देणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. दरम्यान, शरद पवार विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यावर भाष्य करण्याऐवढा मी जाणकार तसेच मोठा नाही. पवारसाहेबांचा राष्ट्रीय राजकारणावरचा वकुब आपण सर्वच जाणतो. सक्षम लोकशाहीसाठी सक्षम विरोधक असणे गरजेचे असते. सत्ता निरंकुश झाल्यावर ती लोककल्याणाचे काम करीत नाही. त्यामुळे सत्तेवर अंकुश असणे आवश्यक आहे. त्यामुळे विरोधकांची मोट बांधणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
काय म्हणाले अमोल कोल्हे?
‘सणांमध्ये राजकारण नको’
आपला सण, उत्सव उत्साहाने साजरा करता येत आहे, ही चांगली गोष्ट आहे. प्रत्येकासाठी आनंदाची बाब आहे. यात राजकारण यायला नको, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.