रयतेचं स्वराज्य निर्माण करणारे शिवराय राष्ट्रनायक, राजनाथ सिंहांच्या शिवाजी महाराजांबद्दलच्या वक्तव्याचा अमोल कोल्हेंकडून निषेध
छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रनायक ठरले ते रयतेसाठी निर्माण केलेल्या कल्याणकारी राज्यामुळे आणि त्या स्वराज्याला असलेल्या नैतिक अधिष्ठानामुळे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले आहे.
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रनायक ठरले ते रयतेसाठी निर्माण केलेल्या कल्याणकारी राज्यामुळे आणि त्या स्वराज्याला असलेल्या नैतिक अधिष्ठानामुळे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले आहे. केंद्रीय सरंक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या धक्कादायक वक्तव्याचा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी निषेध केला आहे. (Amol Kolhe protests Rajnath Singh’s statement about Chhatrapati Shivaji Maharaj)
ऐतिहासिक कागदपत्रांचा धांडोळा घेतला तर सुरुवातीच्या स्वराज्याच्या निर्मितीत दादोजी कोंडदेव यांची नाराजी होती. आदिलशाहीच्या दरबारात शहाजी महाराजांना त्याचा त्रास तर होणार नाही ना अशी स्वामीनिष्ठा त्यापाठी होती. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांची पहिली भेट ही 1671 च्या आसपास झाल्याचे काही ऐतिहासिक कागदपत्रे दाखवून देतात. त्यावेळी स्वराज्य पूर्णत्वास आलेले होते, असे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.
केंद्रीय सरंक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी चुकीच्या ऐकीव माहितीवर विधान केलेले असावे, अशी शक्यताही खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली. आपला जाज्वल्य इतिहास हा निःपक्षपातीपणाने, तर्कसंगत पद्धतीने, अकारण कुणाचेही स्तोम माजवून एकमेकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न टाळून राज्य, देश आणि जगभरात सांगण्याची गरज आहे, असेही डॉ. कोल्हे यांनी स्पष्ट केले.
दोन दिवसापूर्वीच एका हिंदी दिग्दर्शकाने मुघल शासक हे राष्ट्रनिर्माते आहेत असे सांगितले. त्यामुळे हा इतिहास सांगण्याची गरज आणखी प्रकर्षाने जाणवत आहे. केवळ निषेध किंवा एखादे आंदोलन हे क्षणिक ठरू शकते. मला वाटते ही वैचारिक लढाई आहे आणि ती त्याच माध्यमातून लढली गेली पाहिजे, असेही खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले.
साहित्य, कला याचा समाजमनावर दीर्घकालीन परिणाम होतो, त्या माध्यमातून आपण निःपक्षपाती, तर्कसंगत इतिहास जगभर पोहोचवला पाहिजे, असेही खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले.
इतर बातम्या
मी इम्पलसिव्ह आयुष्य जगत नाही, माझं आयुष्य ब्रेकिंग न्यूज नाही; सुप्रिया सुळेंची जोरदार बॅटिंग
(Amol Kolhe protests Rajnath Singh’s statement about Chhatrapati Shivaji Maharaj)