शरद पवार यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा, खासदार अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया काय?
शरद पवार यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, शरद पवार यांच्या अध्यक्षपदाबाबत बोलणं योग्य नाही.
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या राजीनाम्याची घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसची समिती पुढील अध्यक्ष कोण राहील, हे ठरवेल, असं सांगितलं. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांना मोठा धक्का बसला. शरद पवार हे अशी निवृत्ती घेतील, असे त्यांच्या ध्यानीमनी नव्हते. त्यामुळे शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा, असा बहुतेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचा सूर आहे. शरद पवार यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, शरद पवार यांच्या अध्यक्षपदाबाबत बोलणं योग्य नाही. अवघ्या महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांच्या भावना येत आहेत. पण, साहेबांच्या देखील भावना समजून घेतल्या पाहिजेत.
उद्या शरद पवार निर्णय घेतील
गेली अनेक दशक झालं. महाराष्ट्रातील राजकारण हे शरद पवार आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या भोवती फिरत होतं. ते आपण लहानपणापासून पाहात आलो आहोत. उद्या शरद पवार हे पूर्ण विचारांतीच निर्णय घेतील. सुप्रिया सुळे, अजित पवार, जयंत पाटील यांच्याशी बोलणं झालं आहे. त्यामुळं आमच्यात दुरावा नाही, असंही कोल्हे यांनी स्पष्ट केलं.
दिल की सुने या दिमाख की सुने
साहेबांच्या भावना समजून घेणे महत्त्वाचे आहे.संसदेच कामकाज बघताना शरद पवार यांच्या कामाचा आवाका जवळून बघतो. दिल की सुने या दिमाख की सुने, अशा मिश्रा भावना आहेत. उद्या यावर शरद पवार हे निर्णय देतील, असा विश्वास अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला.
शरद पवार यांचे मार्गदर्शन असेलच
पूर्ण विचारांती साहेब निर्णय घेतील. सगळे मोठे नेते आहेत. मी सामान्य कार्यकर्ता आहे. काल मी लोकसभेतल्या नेत्या सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अजित पवार यांच्यासोबत संवाद झाला. दोन गट पडले का, यावर बोलताना ते म्हणाले, समिती उद्या निर्णय घेईल. जो काही निर्णय होईल, शरद पवार यांचे मार्गदर्शन हे असणारच आहे, असंही अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केलं.