‘तुमच्या घरामध्ये किती शिवाजी आणि संभाजी नावे आहेत?’ आनंद दवे यांचा थेट सवाल
मंत्री छगन भुजबळ यांनी ब्राह्मण समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे चांगलचे आक्रमक झाले. त्यांनी छगन भुजबळ यांना थेट नाव बदलण्याचं चॅलेंज दिलं आहे. त्यावर छगन भुजबळ काय म्हणतात, ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.
पुणे | 19 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न-नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ब्राह्मण समाजाबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झालाय. ब्राह्मण समाजात शिवाजी आणि संभाजी अशी नावे नसतात, असं वक्तव्य त्यांनी केलं. त्यांच्या या वक्तवर हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी टीका केली आहे. “छगन भुजबळ यांनी आज पुन्हा तारे तोडले आहेत. त्यांनी असं सांगितलं की कोणत्याही ब्राह्मण समाजात छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज यांच्यावरुन मुलांची नावे ठेवली जात नाहीत. मुळात हिंदू धर्मातील कोणत्या जातीला बदनाम करण्याचं धोरण आणि उद्देश छगन भुजबळ यांचा का असतो?” असा सवाल आनंद दवे यांनी केला.
“छगन भुजबळ साहेब तुमच्या घरामध्ये किती शिवाजी आणि संभाजी नावे आहेत? तुम्ही तुमच्या मुलांची शिवाजी आणि संभाजी नावे का नाही ठेवली? तुम्हाला का सारखं ओबीसींचं राजकारण करताना मराठा समाजाला आणि छत्रपतींच्या मराठा समाजाला नावं ठेवण्याचं काम करता?”, असा सवाल आनंद दवे यांनी केला.
“छगन भुजबळ यांनी केलेलं वक्तव्य हे मुर्खपणाचं आहे. एकीकडे तुम्ही संभाजी भिडे यांना त्यांच्या भिडे आडनावावरुन विरोध करता, एकीकडे परत नावं वाचतात. मी अनेक जातींमध्ये छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराजांच्या नावांचे अनेक युवक दाखवू शकतो. पण इथे व्यक्तीशा उल्लेख करणं योग्य होणार नाही”, असं आनंद दवे म्हणाले.
“भुजबळ साहेब तुम्हाला नावं सापडली नाहीत तर आम्ही नावं देऊ. सर्वप्रथम तुम्ही तुमच्या घरातली नावं बदलून दाखवा. तुम्ही स्वत:चं नाव शिवाजी भुजबळ करुन दाखवा. नंतर आमच्याशी बोला”, असं आनंद दवे म्हणाले.
छगन भुजबळ यांचं वादग्रस्त वक्तव्य नेमकं काय?
“मी ब्राह्मणांवर टीका करत नाही. ब्राह्मण वर्ग सोडल्यास तुम्ही आम्ही शुद्र. त्यानंतर मग अतिशुद्र. शिक्षणाचा अधिकार ब्राह्मण वर्गातील फक्त पुरुषांना. महिलांनाही नाही. केवळ दीड टक्के लोकांपुरतंच शिक्षण मर्यादित होतं”, असं छगन भुजबळ म्हणाले.
“त्यांचे नाव संभाजी भिडे नव्हे संभाजी कुलकर्णी आहे. ब्राह्मण समाजाने वाईट वाटू नये. ब्राह्मण समाजात संभाजी शिवाजी असे नाव ठेवत नाही. भिडे म्हणतो, माझ्या बागेतील अंबे खा, मुले होतील. मग मेडिकल कॉलेज कशाला?”, असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं.