‘वडिलांना धमकी दिली तर…’, हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या संतापल्या, दिला मोठा इशारा
हर्षवर्धन पाटील यांच्याबद्दल शिवराळ भाषा वापरणाऱ्यांवर अंकिता पाटील चांगल्याच संतापल्या आहेत. अंकिता पाटील या हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या आहेत. अंकिता यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या तालुकाध्यक्षांना मोठा इशारा दिला आहे.
पुणे | 4 फेब्रुवारी 2024 : भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आपल्याला इंदापुरात फिरु न देण्याची धमकी आल्याची तक्रार केली आहे. त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांचीदेखील प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला मोठा इशारा दिला आहे. वडिलांना धमकी दिली तर ठाकरे शैलीत उत्तर देणार, असा इशारा हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता पाटील यांनी दिला आहे. प्रत्येकाने संस्कृती जपून पातळी सांभाळून बोलावं, असं आवाहन अंकीता पाटील यांनी केलं आहे. “माझ्या वडिलांबाबत असं एकेरी शब्द तुम्ही वापरत असाल, जे तालुकाध्य आहेत, लोकप्रतिनिधींच्या अवतीभोवती असतात, ते माझ्या वडिलांबाबत असे शब्द उच्चारत असतील तर मी पण त्यांना खूप चांगल्या पद्धतीने ठाकरे शैलीत उत्तर देऊ शकते हे त्यांनी लक्षात ठेवावं. ही आपली संस्कृती नाहीय. मला त्यांना एकच सांगायचं आहे, पातळी सांभाळून बोला. आम्हीपण आमची पातळी सांभाळून बोलत आहोत”, असं अंकिता पाटील म्हणाल्या.
हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर फिरु न देण्याची धमकी आली होती. या धमकीनंतर त्यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवलं. मित्रपक्षातील काही पदाधिकारी शिवराळ भाषेचा वापर करतात, असं हर्षवर्धन पाटलांनी लिहिलंय. सुरक्षेची चिंता असल्याने फडणवीसांना पत्र लिहिलंय, असं हर्षवर्ध पाटलांनी म्हटलंय.
नेमकं प्रकरण काय?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीका करताना शिवराळ भाषा वापरली. “तुझ्याजवळ काय होतं? महाले साहेब म्हणून एक होता, खरेदी-विक्री संघात अधिकारी होता. इथं 2 हजारासाठी 2 तास त्याच्या दाराबाहेर बसावं लागत होतं. या हर्षवर्धव पाटलाला. अकलूजला मोटारसायकलवर जाण्यासाठी सावंतांकडे 3 तास दुकानात थांबायचा. आन हे काय सांगतो? मामानं असं केलं अन् तसं केलं? आरे मामा गाडीत आणि माडीतच जनमलेला आबे. तुझ्याजवळ काय होतं तेव्हा, 1970 मध्ये मामाकडे गाडी आणि बंगला होता. तुझ्यासारखा असा भिXXXX नव्हता”, अशा शब्दांत हनुमंत कोकाटे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीका केली.
हर्षवर्धन पाटील यांनी पत्रात काय म्हटलं?
हनुमंत कोकाटे यांच्या टीकेनंतर हर्षवर्धन पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं. या पत्रात त्यांनी आपल्याला इंदापुरात फिरु न देण्याची धमकी देण्यात आल्याचं म्हटलं. “महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचे सरकार आपल्या मार्गदर्शनाखाली योग्य पद्धतीने कामकाज करीत आहे. पण माझ्या तालुक्यामध्ये मी आपल्या नेतृत्वाखाली राजकिय आणि सामाजिक जीवनात काम करत असताना इंदापूरमधील मित्रपक्षांचे काही पदाधिकारी राजकीय जाहीर मेळावे आणि सभांमधून माझ्यावरती अतिशय खालच्या पातळीवर, एकेरी आणि शिवराळ भाषेत बेताल वक्तव्य करीत आहेत. त्याचबरोबर तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी देत आहेत. त्यामुळे मला माझ्या सुरक्षिततेची चिंता वाटत आहे”, असं हर्षवर्धन पाटील यांनी पत्रात म्हटलं आहे.
“सदरील बाब अतिशय गंभीर असून, आपण यामध्ये तात्काळ लक्ष घालावे. अशा गुंड प्रवृत्तींच्या लोकांना वेळीच आळा घालणे आवश्यक आहे. तरी आपण याबाबत ठोस भूमिका घेऊन योग्य त्या कारवाईचे आदेश देऊन सहकार्य करावे ही विनंती”, असं हर्षवर्धन पाटील फडणवीसांना पाठवलेल्या पत्रात म्हणाले आहेत.