Anna Hazare | अण्णा हजारे यांनी कठोर पाऊल अखेर उचललंच, जितेंद्र आव्हाड अडचणीत येणार?
जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात मोठं पाऊल उचललं आहे. त्यामुळे आगामी काळात नेमक्या काय-काय घडामोडी घडतात, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
योगेश बोरसे, Tv9 मराठी, पुणे | 7 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या आगामी काळात अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी त्यांच्याविरोधात मोठं पाऊल उचललं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी अण्णा हजारे यांच्यावर ट्विटरवर सडकून टीका केली होती. त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना अण्णा हजारे यांनी आव्हाड यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आता याच प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. अण्णा हजारे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात कायदेशीर पाऊल उचललं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अण्णा हजारे यांनी जितेंद्र आव्हाड यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. अण्णा हजारे यांचे कायदेशीर सल्लागार ॲड मिलिंद पवार यांच्यामार्फत ही नोटीस पाठवण्यात आली आहे. अण्णा हजारे यांनी यापूर्वीच जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार, असा इशारा दिला होता. त्यानंतर आता अण्णा हजारे यांच्याकडून प्रत्यक्ष कायदेशीर पाऊल उचलण्यात आलंय.
अण्णा हजारेंकडून शरद पवारांनाही नोटीस
अण्णा हजारे यांनी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांच्या माहितीसाठी शरद पवारांनाही नोटीस पाठवली आहे. जितेंद्र आव्हाड आणि शरद पवारांनी खुलासा करावा, अशी मागणी अण्णा हजारे यांनी केलीय. जितेंद्र आव्हाडांनी माफी मागावी. अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाणार, असा इशारा अण्णा हजारे यांनी नोटीसद्वारे दिलाय.
विशेष म्हणजे जितेंद्र आव्हाड यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते राष्ट्रवादी पक्षाच्या प्रकरणावर निवडणूक आयोगात झालेल्या सुनावणीवरुन भावूक झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाने केलेल्या युक्तिवादावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांना अण्णा हजारे यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “अण्णा हजारे यांना जी कारवाई करायची आहे ती करावी. केर्टात जा, कुठेही जा. मला फरक पडत नाही”, अशी प्रतिक्रिया दिली.
नेमकं प्रकरण काय?
जितेंद्र आव्हाड यांनी तीन दिवसांपूर्वी अण्णा हजारे यांचा फोटो ट्विट करत त्यांच्यावर टीका केली होती. “या माणसाने देशाचं वाटोळे केले. टोपी घातली म्हणजे कुणी गांधी होत नाही”, असं खोचक ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. त्यांच्या या टीकेवर अण्णा हजारे यांच्याकडूनही प्रतिक्रिया देण्यात आली होती. अण्णा हजारे यांनी आव्हाडांना प्रत्युत्तर दिलं होतं. तसेच त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला होता.
“माझ्यामुळे देशाचं वाटोळं झालं असं म्हणायचं तर मी एवढे काय कायदे केले त्या कायद्याचा जनतेला फायदा झाला. माहितीचा अधिकार या देशाला मिळाला. एक झालं, माझ्या काही आंदोलनामुळे यांच्या कार्यकर्त्याचं वाटोळं झालं हे नाकारता येत नाही. बरेच कार्यकर्ते घरी गेले ना, हे त्यांचं नुकसान झालं. ते त्यांना कदाचित सहन होत नसेल. म्हणून काहीतरी कुरापत काढायची, बदनामी करायची. पण काही फरक पडत नाही”, अशी भूमिका अण्णा हजारे यांनी मांडली.