Bhagatsingh Koshyari : राज्यपालांची राजकीय वक्तव्ये थांबेनात! दोन वेगळ्या विचारांचे लोक एकत्र आले, माझ्या शुभेच्छा म्हणत लगावला टोला
राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते बालाजी तांबे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी राजकीय टोलेबाजी पाहायला मिळाली. राजकीय वक्तव्य केल्याने पुन्हा राज्यपाल चर्चेत आले आहेत.
लोणावळा, पुणे : स्वर्गीय बालाजी तांबे (Balaji Tambe) यांच्या आयुर्वेदाच्या उपचारामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार एकत्र आले, असे वक्तव्य माजी मंत्री सुनील तटकरे यांनी केले. तर तोच धागा पकडून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी आत्ताच्या परिस्थितीवर कोपरखळी मारत दोन वेगळ्या विचाराचे व्यक्ती एकत्र आले अन् आघाडी बनवली, असा टोला लगावला आहे, ते लोणावळ्यात बोलत होते. राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते बालाजी तांबे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी राजकीय टोलेबाजी पाहायला मिळाली. राजकीय वक्तव्य केल्याने पुन्हा राज्यपाल चर्चेत आले आहेत. तर विभिन्न राजकीय व्यक्तींवर एकाच प्रकारचे उपचार केले जाऊ शकतात, हे बालाजी तांबेंनी त्यावेळी दाखवले, असे सुनील तटकरे (Sunil Tatkare) यावेळी म्हणाले.
सातत्याने वादग्रस्त वक्तव्याने आले चर्चेत
आपल्या वादग्रस्त वक्तव्याने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी मागील काही काळापासून चर्चेत आहेत. सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले, मुंबई आर्थिक राजधारी, महात्मा गांधींविषयीचे वादग्रस्त वक्तव्य अशा विविध कारणाने ते चर्चेत आले. त्यांच्या राजकीय वक्तव्ये आणि भूमिकांमुळे त्यांच्यावर सातत्याने टीकाही होत आहेत. आता कोणतेही वक्तव्य करणार नाही, असे ते अलिकडेच म्हणाले होते. मात्र त्यांची वादग्रस्त भाषा अद्यापही थांबायला तयार नाही.
गांधींबद्दल काय म्हणाले होते कोश्यारी?
पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि हुतात्मा राजगुरू यांच्या 114व्या जयंती सोहळ्यात ते म्हणाले, की देशाच्या स्वातंत्र्यासाठी गांधींसोबत इतर क्रांतिकारकांचेही योगदान आहे. फक्त गांधीजींचेच एकतर्फी समर्थन करू नका, असे वादग्रस्त विधान त्यांनी काल केले होते. त्यानंतर आता आज पुन्हा राजकारणावर भाष्य करत विभिन्न विचाराचे लोक एकत्र आले, माझ्या त्यांना शुभेच्छा, असे विधान त्यांनी केले.
‘आयुर्वेदिक केंद्र होऊ शकते’
हा सर्व परिसर आत्मसंतुलन या नावाने ओळखला जातो. पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये याचेही महत्त्व आहे. राज्याचे तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे एकाचवेळी याठिकाणी उपचारासाठी आले आणि त्यानंतर सर्वांनाच कळाले, की याठिकाणी महत्त्वाचे आयुर्वेदिक केंद्र होऊ शकते, असे तटकरे म्हणाले.