Pune ICMR-NARI : पुण्यातल्या राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेच्या संचालकपदी डॉ. शीला गोडबोले
एचआयव्ही इम्युनोलॉजी, एचआयव्ही ड्रग रेझिस्टन्स आणि अँटीमाइक्रोबियल रेझिस्टन्समधील संशोधनातही त्यांनी सहकार्य केले आहे. त्या राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेच्या विविध समित्या आणि तांत्रिक संसाधन गटांवर काम करतात.
पुणे : डॉ. शीला गोडबोले यांनी 19 मे रोजी ICMR-राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था (National AIDS Research Institute), पुणे येथे संचालक म्हणून पदभार स्वीकारला. संचालक म्हणून रुजू होण्यापूर्वी त्या ICMR-NARI येथे एपिडेमियोलॉजी विभागाच्या प्रमुख होत्या. डॉ. गोडबोले पुण्याच्या बायरामजी जीजीभॉय मेडिकल कॉलेज (BJMC)च्या माजी विद्यार्थिनी आहेत आणि त्यांनी 1992मध्ये MD प्राप्त केली आहे. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रकल्पांच्या प्रमुख अन्वेषक म्हणून त्यांनी संपूर्ण भारतभर मोठ्या प्रमाणात सहयोगी अभ्यासाचे नेतृत्व केले आहे. Covid-19साठी क्लिनिकल चाचण्या, HIV, STIs, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही), एचआयव्ही-कर्करोग संशोधन, एचआयव्ही आणि जन्मजात सिफिलीस निर्मूलन अभ्यास आणि सरकारी कार्यक्रमांचे परिणाम मूल्यमापन यामधील क्लिनिकल आणि महामारीसंबंधीचे संशोधन त्यांनी केले आहे. आता त्यांनी आयसीएमआर-नारी या संस्थेचा पदभार स्वीकारला आहे.
विविध संशोधनात सहभाग
एचआयव्ही इम्युनोलॉजी, एचआयव्ही ड्रग रेझिस्टन्स आणि अँटीमाइक्रोबियल रेझिस्टन्समधील संशोधनातही त्यांनी सहकार्य केले आहे. त्या राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेच्या विविध समित्या आणि तांत्रिक संसाधन गटांवर काम करतात. तसेच त्या जागतिक आरोग्य संघटनेच्या तांत्रिक सल्लागार गटाच्या सदस्यादेखील आहेत. एक अनुभवी चिकित्सक आणि संशोधक डॉ. गोडबोले या संस्थेला रोग निर्मूलन संशोधन तसेच एचआयव्ही आणि सह-संक्रमणावरील संशोधनात नवीन क्षितिजाकडे मार्गदर्शन करण्यास उत्सुक आहेत, असे जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
1992मध्ये स्थापना
नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट ही एक संशोधन संस्था आहे, जी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR)द्वारे चालवली जाते. बायोमेडिकल संशोधनाची निर्मिती, समन्वय आणि प्रोत्साहन यासाठी भारतातील ही सर्वोच्च संस्था आहे. भारतातील एचआयव्ही/एड्सवरील बायोमेडिकल संशोधनात नेतृत्व प्रदान करण्याच्या उद्देशाने 1992मध्ये त्याची स्थापना करण्यात आली. भोसरी, पुणे येथे मुख्यालय आहे.