पुणे : कसबा आणि चिंचवडच्या (Chinchwad) पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली. चिंचवड मतदारसंघासाठी भाजपकडून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांचे नाव जाहीर करण्यात आले. कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केली. चिंचवड मतदारसंघात जगताप कुटुंबातील दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. या मतदारसंघाच्या जागेसाठी घरातील दोघांच्या नावांची चर्चा होती. लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप किंवा लक्ष्मण जगताप यांचे लहान भाऊ शंकर जगताप. दोन दिवसांपूर्वी या दोघांनीही उमेदवारी अर्ज घेतले होते. ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अश्विनी जगताप म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यानुसार आम्ही सर्वजण निवडणूक लढवत आहोत. कुटुंब पूर्णपणे माझ्याबरोबर आहे.
भाजप, शिंदे गट तसेच आरपीआयची फळी माझ्यासोबत आहे. या तीनही पक्षांचा आम्हाला पाठिंबा आहे. नगरसेवक आणि कार्यकर्ते आमच्याबरोबर आहेत. पिंपरी चिंचवड तसेच गावकरी माझ्याबरोबर आहेत. त्यामुळं मी एकटी असल्याची भीती वाटत नसल्याचं अश्विनी जगताप यांनी सांगितलं.
आमच्या घरात वाद असल्याची वावटळ विरोधकांनी उठविलं आहे. विरोधकांनी असं करू नये. शंकर जगताप हे मला मुलासारखे आहेत. आम्ही म्हणायचो की, मला एक मुलगी नाही. सहा मुलं आहेत.
आमचं ३० वर्षांपासून एकत्र कुटुंब आहे. आम्ही प्रत्येक निर्णय एकत्र कुटुंबात घेतला. लग्नसुद्धा एकत्र कुटुंबातून झालेली आहेत. त्यामुळं जगताप कुटुंब हे वेगळं नाही. आम्ही सर्व एकचं आहोत. असे खोटे आरोप विरोधकांनी करू नये, अशी आग्रहाची विनंती असल्याचं अश्विनी जगताप म्हणाल्या.
आमच्या कुटुंबात कुठलाही वाद नाही. विरोधक याचं भांडवल करण्याचा प्रयत्न करत आहेत. यात कोणतही तथ्य नाही, असंही अश्विनी जगताप म्हणाल्या. दोन दिवसांपूर्वी दोघांनीही उमेदवारी अर्ज आणल्यामुळं दोघेही इच्छुक होते. पण, पक्षानं तिकीट अश्विनी जगताप यांना दिली.