नोटांवर एका माणसाचाच फोटो का ? लेखक विक्रम संपथ यांचे वाद निर्माण करणारे वक्तव्य
Pune News | देशात वाद निर्माण करणारे वक्तव्य अधूनमधून काही जणांकडून होत असतात. आता प्रसिद्ध लेखक विक्रम संपथ यांनीही असे वक्तव्य केले आहे. नोटांवर एका माणसाचाच फोटो का ? नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, लाला लाजपतराय, लोकमान्य टिळक यांचे फोटो देखील असायला हवेत...
योगेश बोरसे, पुणे, दि.19 डिसेंबर | बँकिंग क्षेत्रात काम करणारे तज्ज्ञ आणि लेखक विक्रम संपथ यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. नोटांवर एका माणसाचाच फोटो का? सावरकर आणि लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे फोटो कधी येणार ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता नवीन वाद निर्माण होणार आहे. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पुस्तक महोत्सवात लेखक विक्रम संपथ यांनी हे वक्तव्य केले. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर समज – गैरसमज’ या विषयावर त्यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.
नेमके काय म्हणाले विक्रम संपथ
‘स्वातंत्र्यवीर सावरकर समज – गैरसमज’ या विषयावरील मुलाखतीत बोलत असताना प्रेक्षकांमधून विक्रम संपथ यांना विचारण्यात आले की, भारतीय चलनावर केवळ एकाच व्यक्तीचे छायाचित्र आपल्याकडे आहे. भविष्यात कधी सावरकरांचा आणि टिळकांचा फोटो चलनात दिसेल का? या प्रश्नाला उत्तर देताना विक्रम संपथ म्हणाले की, ‘मला तो दिवस आवडेल जेव्हा असे काही होईल, पण त्याचबरोबर नोटांवर सावरकरांसोबतच, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, लाला लाजपतराय, लोकमान्य टिळक यांचे फोटो देखील असायला हवेत. हे बाकीचे पण देशाचे हिरो आहेत. यामुळे त्यांचा फोटो देखील असायला हवा.
इंडोनेशियामधील दिले उदाहरण
नोटांवर एकच फोटो का असावा? असे सांगताना विक्रम संपथ यांनी म्हटले की, इंडोनेशियामध्ये जसे वेगवेगळ्या महापुरुषांचे फोटो नोटांवर असतात. तसे आपल्याकडे देखील असावे. संपथ यांच्या या वक्तव्यानंतर आता नवीन वाद निर्माण होणार आहे.
कोण आहेत विक्रम संपथ
विक्रम संपथ यांचा जन्म कर्नाटकमध्ये झाला आहे. त्यांनी बँकिंगमध्ये काम केले. 2008 मध्ये त्यांनी म्हैसूरच्या वाडियार राजघराण्याचा इतिहास प्रकाशित केला. त्याचबरोबर विनायक दामोदर सावरकर यांचे चरित्र दोन भागांमध्ये लिहिलेली आहे. 2011चा साहित्य अकादमीचा इंग्रजी साहित्यातील युवा पुरस्कार देखील विक्रम संपथ यांना मिळालेला आहे.