पुणेकरांना खुशखबर, रिक्षा सेवेत होणारा हा चांगला बदल
पुणे शहरातील वाढत्या प्रवासी संख्येने सार्वजनिक वाहतुकीवरील ताण वाढला आहे. त्यात ओला, उबेरसारख्या कंपन्या प्रवाशांना डिजिटल सेवा देत आहेत. त्यामुळे रिक्षा सेवाही डिजिटल करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
पुणे : पुणे शहरातील स्वारगेट, वाकडेवाडी व पुणे रेल्वे स्थानक (Pune Railway Station) येथे प्रिपेड रिक्षा केंद्र सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) हा निर्णय घेतला आहे. पुण्यात प्रिपेड रिक्षा सेवा (Prepaid Auto Services) येत्या 15 दिवसांत तीन ठिकाणी सुरु होणार आहे. यामुळे गर्दीच्या ठिकाणी प्रवाश्यांची होणारी लूट थांबणार आहे. यासंदर्भात आरटीओ, पुणे वाहतूक पोलीस, रिक्षा संघटना यांची नुकतीच बैठक झाली आहे. स्वारगेट येथून चाचणी घेण्यात आली. तसेच या माध्यमातून ओला, उबेर सारख्या खाजगी सर्व्हीसला टक्कर देता येणार आहे.
पुणे शहरातील वाढत्या प्रवासी संख्येने सार्वजनिक वाहतुकीवरील ताण वाढला आहे. त्यात ओला, उबेरसारख्या कंपन्या प्रवाशांना डिजिटल सेवा देत आहेत. त्यामुळे रिक्षा सेवाही डिजिटल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरात प्रिपेड रिक्षा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती आरटीओ प्रशासनाने दिली आहे.
पहिल्या टप्प्यात तीन केंद्रे
शहरातील स्वारगेट, वाकडेवाडी, पुणे रेल्वे स्थानक या तीन ठिकाणी प्रिपेड रिक्षा केंद्र सुरू करण्यात येणार आहे. याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयात रिक्षा संघटना आणि अधिकाऱ्यांमध्ये नुकतीच बैठक झाली.
दोन सॉफ्टवेअरने चालणार कामकाज
पुणे शहरात सुमारे 40 हजार रिक्षा आहेत. रोज लाखो प्रवासी रिक्षेने प्रवास करीत असतात. त्यामुळेच प्रिपेड रिक्षा सेवा सुरु करण्याचा निर्णय झाला. डिजीटल पद्धतीने सेवा देण्यासाठी दोन सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहेत. दोन सॉफ्टवेअरच्या माध्यमातून प्रिपेड सेवेचे कामकाज चालणार आहे. त्यामुळे नागरिकांची होणारी फसवणूक टळणार आहे.
फसवणूक थांबणार
रेल्वे स्थानक व शहरातील अन्य भागांत प्रवाशांकडून रिक्षाचालक जास्त पैसे घेतात, अशा तक्रारी असतात. परंतु प्रिपेड मीटरची सुविधा सुरु झाल्यावर प्रवाशांची होणारी फसवणूक टळणार आहे. आपणास इच्छित स्थळी पोहचण्यासाठी किती पैसे लागतात, हे आधीच प्रवाशांना समजणार आहे.
चाचणी यशस्वी
रिक्षाचालक – मालक प्रतिनिधी महासंघाकडून स्वारगेट येथे प्रायोगिक तत्वावर दोन दिवस रिक्षांची चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाली. तिला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तसेच या सेवेबाबत प्रवाशांना ज्या अडचणी आल्या त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यानंतर येत्या 15 दिवसांत प्रिपेड रिक्षा सुरु होणार आहे. या सेवेला मिळालेल्या प्रतिसाद पहिल्यानंतर त्याची व्याप्ती वाढवण्यात येणार असल्याचे आरटीओ प्रशासनाने सांगितले.