Pune rain : बाबा भिडे पूल वाहतुकीसाठी बंद, खडकवासला धरणातून पाण्यचा विसर्ग वाढवल्यानं नदीपात्रातून भरभरून वाहतंय पाणी
बंगालच्या उपसागरात सध्या तीव्र कमी दाबाचे क्षेत्र आता वादळात रूपांतरित झाले आहे. त्यामुळे राज्यात पुढील दोन ते तीन दिवस मध्यम ते मुसळधार पाऊस पडणार आहे. हवामान खात्याने हा इशारा दिला आहे.
अभिजीत पोते, पुणे : खडकवासला धरण (Khadakwasla Dam) साखळीमध्ये सुरू असणाऱ्या पावसाच्या संततधारेमुळे धरण साखळीतील चारही धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळे काल रात्री अकरा वाजता खडकवासला धरणामधून 12,321 क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग (Water released) करण्यात आला आहे. त्यामुळे नदीपात्रातील रस्ता आता प्रशासनाकडून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सध्या खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांत मिळून 29.15 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू राहणार असल्याची माहिती देखील प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यासोबतच पावसाचा जोर (Heavy rain) पाहता हा विसर्ग वाढवला जाऊ शकतो, अशी माहितीदेखील प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पुणे शहरात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र जिल्ह्यातील धरणसाखळी परिसरात अजूनही पाऊस सुरू आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे.
‘नागरिकांनी पर्यायी पुलांचा वापर करावा’
रात्रीपासून हा विसर्ग सुरू करण्यात आल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीपात्रात पाणी वाढल्याने बाबा भिडे पूलदेखील भरून वाहत आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. नागरिकांनी पर्यायी पुलांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. मागील महिन्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर बाबा भिडे पूल बंद करण्यात आला होता. आता पुन्हा पाण्याचा विसर्ग वाढवल्याने तो बंद करण्यात आला आहे.
बाबा भिडे पूल बंद
तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
बंगालच्या उपसागरात सध्या तीव्र कमी दाबाचे क्षेत्र आता वादळात रूपांतरित झाले आहे. त्यामुळे राज्यात पुढील दोन ते तीन दिवस मध्यम ते मुसळधार पाऊस पडणार आहे. हवामान खात्याने हा इशारा दिला आहे. याच काळात पुणे शहर व जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढणार आहे. घाटमाथ्याच्या तसेच धरण परिसरातही पावसाचा जोर अधिक असू शकतो, असे हवामान खात्याने म्हटले आहे. त्यामुळे आधीच धरणे भरली आहेत. त्यात अधिकचा पाऊस पडणार असल्याने विसर्ग वाढवला जाण्याची शक्यता आहे.