शिंदे सोबत गुवाहाटीला जाण्यापूर्वी भाजपसोबत काय ठरले, बच्चू कडू यांनी प्रथमच केला गौप्यस्फोट
bacchu kadu and eknath shinde : आमदार बच्चू कडू यांनी सांगितले की, मला गुवाहाटीला जाण्यापूर्वी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला. शिंदे यांच्या सोबत गुवाहाटीला त्यावेळी आमची सविस्तर चर्चा झाली. मी एक अट ठेवली...
रणजित जाधव, पिंपरी चिंचवड | 22 ऑगस्ट 2023 : राज्यात एकनाथ शिंदे यांचे सरकार स्थापन होऊन आता वर्षापेक्षाही जास्त कालावधी झाला आहे. परंतु शिवसेनेतून एकनाथ शिंदे बाहेर पडल्यानंतर नेमके काय ठरले होते? या गोष्टींच्या चर्चा अधुनमधून होत असतात. त्यावर आता आमदार आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी मोठा गौप्यस्फोट केला.गुवाहाटीला जाण्यापूर्वी भारतीय जनता पक्षासोबत काय ठरले होते? खोके की अन्य काय…हे बच्चू कडू यांनी सांगितले.
काय म्हणाले बच्चू कडू
मला गुवाहाटीला जाण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला. शिंदे यांच्या सोबत गुवाहाटीला जाण्यापूर्वी अगोदर देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझे बोलणे झाले, अशी माहिती बच्चू कडू यांनी भर कार्यक्रमात दिली. त्यांच्या सांगण्यानुसार मी शिंदे सरकारमध्ये शामिल झाल्याचं गुपित आमदार बच्चू कडू यांनी जाहीरपणे सांगितले. ते पिंपरी-चिंचवडमध्ये दिव्यांग कल्याणकारी योजनाच्या कार्यक्रमात बोलत होते.
काय ठेवली होती अट
बच्चू कडू यांनी सांगितले की, मी शिंदे साहेबांसोबत येण्यासाठी अट घातली. ही अट म्हणजे दिव्यांग मंत्रालय होत असेल तर मी तुमच्यासोबत येतो, अशी होती. देवेंद्र फडणवीस यांना हे मी स्पष्टपणे सांगितले आणि त्यांनी त्याला होकार दिला. त्यामुळे मी गुवाहाटीला गेलो.
बदनाम झालो पण…
शिंदे सरकारसोबत आल्यानंतर 50 खोके 50 खोके म्हणून आम्ही बदनाम झालो. परंतु, मला या गोष्टींबद्दल काहीच वाटत नाही. मला बदनामीची चिंता वाटत नाही. आम्ही बदनाम झालो, परंतु तुमच्यासाठी उभे राहिलो. बदनामीचे काय कराचये आहे, पण बदनामी होऊन माझ्या दिव्यांग बंधूंना घर मिळत असेल तर मी त्यासाठी तयार आहे. आता अनेक जण मंत्री पद मागत होते. मला मंत्रालयच भेटले आता मंत्रिपदाचं काय काम आहे असं बच्चू कडू यांनी म्हटलंय. त्यामुळे ते मंत्रीपदावरून नाराज नसल्याचं स्पष्ट झाला आहे. यामुळे बच्चू कडू नाराज असल्याच्या चर्चा आता थांबणार आहे.