Baramati Vidhan Sabha: बारामती कोणत्या पवारांची?, विधानसभा निवडणुकीत होणार फैसला? पुन्हा कुटुंबातच सामना रंगणार?

baramati assembly constituency: पुणे जिल्ह्यातील या 21 मधून सर्वांचे लक्ष पुन्हा बारामती या विधानसभा मतदार संघावर असणार आहे. हा मतदार संघ आता अजित पवार यांचे राजकीय भविष्य निश्चित करणार आहे. लोकसभेतील पराभवाचा वचपा काढत अजित पवार विधानसभेत पुनरागमन करणार का?

Baramati Vidhan Sabha: बारामती कोणत्या पवारांची?, विधानसभा निवडणुकीत होणार फैसला? पुन्हा कुटुंबातच सामना रंगणार?
बारामती विधानसभा मतदार संघ
Follow us
| Updated on: Oct 01, 2024 | 10:46 AM

राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. राजकीय पक्षांच्या बैठका आणि सर्व्हे सुरु आहेत. उमेदवार ठरवले जात आहेत. युती अन् आघाड्यांमध्ये जागा वाटप सुरु आहे. आता राजकीय तज्ज्ञांचे नव्हे तर सर्वांचे लक्ष बारामतीकडे लागले आहे. बारामती पवार कुटुंबियांमुळे देशात अन् राज्यात चर्चेत असलेले शहर आहे. बारामतीचे राजकारण पवार कुटुंबियांभोवती फिरत असते. आधी शरद पवार त्यानंतर अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा अन् विधानसभेचे मैदान मारले. अजित पवार यांनी 1982 साली राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर एकदा खासदार आणि आतापर्यंत सातवेळा आमदार बारामतीमधूनच झाले. मागील वर्षी अजित पवार यांनी वेगळी वाट निवडली. शरद पवार यांच्या राजकीय भूमिकेशी वेगळी भूमिका घेत महायुतीची साथ घेतली. त्यानंतर शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना रंगू लागला. लोकसभा निवडणुकीत हा सामना दिसला. आता विधानसभा निवडणुकीत हाच सामना दिसणार आहे.

बारामती विधानसभा राज्यात सर्वाधिक चर्चेत ठरणार

महाराष्ट्रातील सर्वात चर्चेतील लढत पुन्हा बारामती विधानसभा ठरणार असल्याची चिन्ह दिसू लागली आहे. लोकसभेत देशाचे लक्ष बारामती मतदार संघावर होते. कारण या ठिकाणी नणंद भावजयमध्ये लढत झाली होती. त्यातही ती पवार कुटुंबातील लढत होती. या लढतीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी पराभूत केले होते. आता विधानसभेतही पवार कुटुंबात सामना रंगणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. लोकसभेतील लढत अजित पवार विरुद्ध शरद पवार कुटुंबात होती. आता विधानसभेची लढत अजित पवार यांच्याच कुटुंबात होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बारामती मतदार संघाचा इतिहास

बारामती मतदार संघातील लोकांचा प्रमुख व्यवसाय हा शेती आहे. बाजरी, गहू, ज्वारी, ऊस, द्राक्षे ,मका आणि कापूस ही येथील पिके आहेत. पवार कुटुंबांकडून मोठ्या प्रमाणावर बारामतीचा विकास केल्यामुळे येथील शेती समृद्ध आहे. बारामती शिक्षणाबाबत एक गाजलेले शहर आहे. या ठिकाणी असलेल्या शिक्षण संस्था आणि सहकार क्षेत्रावर पवार कुटुंबाचे एकहाती वर्चस्व राहिले आहे. बारामती लोकसभा किंवा विधानसभा मतदारसंघात पवार घराण्याचे वर्चस्व राहिले आहे. 1962 मध्ये काँग्रेसच्या मालतीबाई शिरोळे या उमेदवार निवडून आल्या होत्या. त्यानंतर 1967 पासून 2019 पर्यंत या विधानसभा मतदार संघात पवार कुटुंबाव्यतिरिक्त इतर कोणताही उमदेवार निवडून आला नाही. 1967 पासून ते 1990 पर्यंत शरद पवार बारामतीचे आमदार होते. त्यानंतर त्यांनी लोकसभेचा मार्ग निवडला आणि आपली जागा अजित पवार यांच्याकडे दिले. मग 1991 ते 2019 पर्यंत अजित पवार बारामतीचे आमदार राहिले. आता 2024 मध्ये अजित पवार निवडणूक लढण्यास नकार देत आहे. यामुळे 2024 मध्ये बारामतीतून पवार कुटुंबातील कोणता चेहरा मिळणार, हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे.

हे सुद्धा वाचा
बारामती विधानसभा मतदार संघात आतापर्यंतचे विजयी उमेदवार वर्ष
मालतीबाई शिरोळे 1962
शरद पवार 1967
शरद पवार 1972
शरद पवार 1978
शरद पवार 1980
शरद पवार 1985
शरद पवार 1990
अजित पवार 1991
अजित पवार 1995
अजित पवार 1999
अजित पवार 2004
अजित पवार 2009
अजित पवार 2014
अजित पवार 2019

बारामतीमधील मतदार अन् जातीय गणित

1952 मध्ये देशात पहिली निवडणूक झाली. त्यावेळी बारामती मतदारसंघ आस्तित्वात नव्हता. 1957 च्या निवडणुकीत बारामती मतदारसंघाचे गठन केले गेले. बारामती लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा क्षेत्र येत असून बारामती हा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. बारामती विधानसभा मतदार संघात 2019 मध्ये 3,39,800 मतदार होते. त्यात 51,245 एससी, 3,145 एसटी, 15,042 मुस्लिम मतदार होते. ग्रामीण मतदार 2,81,103 तर शहरी मतदार 58,697 होते. म्हणजेच बारामती मतदार संघावर ग्रामीण भागाचे वर्चस्व आहे. 2019 च्या आकडेवारीनुसार बारामती विधानसभा मतदारसंघात पुरुष मतदारांची संख्या 1,76,110 तर महिला 1,63,690 एवढी आहे. बारामती मतदारसंघात एकूण 352 मतदान केंद्र आहेत.

बारामती मतदार संघात एकूण मतदार 3,39,800
पुरुष 1,76,110
महिला 1,63,690
एससी 51,245
एसटी 3,145
मुस्लीम 72705

बारामतीत कोण असणार उमेदवार

बारामती विधानसभा निवडणुकीत अजित पवार रिंगणात उतरणार नाही, असे स्पष्ट संकेत त्यांनी अनेक वेळा दिले आहेत. त्यानंतर त्यांचा मुलगा जय पवार यांना उमेदवारी देण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली. तेव्हा त्यासंदर्भातील निर्णय पक्ष घेईल, असे अजित पवार यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना संबोधित करताना केले होते. त्यामुळे बारामतीत अजित पवार ऐवजी जय पवारच निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची शक्यता आहे.

अजित पवार गटाकडून जय पवार रिंगणात उतरल्यावर शरद पवार गटाकडून कोण उमेदवार असणार? बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार अशीच लढत होणार का? हे प्रश्न आहेत. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. जर तसे झाले तर लोकसभा निवडणुकीत पवार कुटुंबातील सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे यांची लढत झाली होती. तशीच लढत विधानसभा निवडणुकीत पवार कुटुंबात होणार आहे. बारामतीत जय पवार Vs युगेंद्र पवार अशी लढाई दिसणार आहे. म्हणजेच लोकसभेत नणंद-भावजय लढत रंगली होती. आता विधानसभेत भाऊ विरुद्ध भाऊ अशी लढत होणार आहे.

2019 मधील विधानसभा निवडणुकीत काय घडले होते…
उमेदवार मिळालेली मते टक्केवारी पक्ष
अजित पवार 195,641 83.80%
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
अशोक माने 1,421 0.60% बहुजन समाज पार्टी
बापू भिसे 344 0.20% अपक्ष
दादा एकनाथ थोरात 284 0.10% अपक्ष
अविनाश घोपाने 3,111 1.30%
वंचित बहुजन आघाडी
गोपीचंद पडळकर 30,376 13.00% भाजप
मधुकर मोरे 1,318 0.60% अपक्ष
राहुल थोरात 361 0.20% अपक्ष
सचिन आगवने 249 0.10% अपक्ष
विनोद चंदगुडे 356 0.20%
राष्ट्रीय जनतांत्रिक पार्टी

लोकसभेपासून युगेंद्र पवार सक्रीय

लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांचे सख्ये बंधू श्रीनिवास पवार यांनी त्यांची साथ सोडली होती. श्रीनिवास पवार यांच्या संपूर्ण कुटुंबाने सुप्रिया सुळे यांचा प्रचार केला होता. श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यासाठी झंझावाती प्रचार केला होता. त्यांनी पायाला भिंगरी लागल्याप्रमाणे बारामती मतदार संघ पिंजून काढला होता. त्याचे बक्षीस म्हणून त्यांना विधानसभेचे तिकीट मिळणार आहे. मध्यंतरी शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यावेळी या कार्यकर्त्यांनी ‘आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे’, अशी मागणी केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही बारामतीमधून युगेंद्र पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले होते. त्यानंतर युगेंद्र पवार यांनी निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली होती. वरिष्ठांनी आदेश दिल्यावर आपली निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचे त्यांनी म्हटले होते.

कोण आहेत युगेंद्र पवार?

शरद पवार गटाकडून चर्चेत असलेलेल युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत. त्यांच्याकडे विद्या प्रतिष्ठानच्या खजिनदारपदाची जबाबदारी आहेत. फलटण तालुक्यात असलेल्या शरयू शुगर कारखान्याचे सूत्र युगेंद्र पवार सांभाळत आहेत. तसेच बारामती तालुका कुस्तीगीर संघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे.

जय पवार यांची तयारी?

आगामी विधानसभा निवडणुकीत बारामती विधानसभेसाठी जय पवार इच्छुक आहेत का? हा प्रश्न आहे. त्याला त्यांनी माध्यमांसमोर उत्तरही दिले होते. जय पवार यांनी अगदी मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले, “उपमुख्यमंत्री अजित पवार ठरवतील तसे.”

बारामती विधानसभा मतदार संघ

बारामतीचा गडसुद्धा अजित पवार यांच्यासाठी अवघडच

लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला होता. बारामती लोकसभेतील इतर मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघ आहे. त्यातील अजित पवार यांचे वर्चस्व असलेल्या बारामती विधानसभा मतदार संघानेही त्यांना साथ दिली नाही. त्या ठिकाणी सुप्रिया सुळे यांना तब्बल 44 हजारांचे लीड मिळवले होते. सुप्रिया सुळे यांना 1 लाख 43 हजार 941 मते मिळाली होती. सुनेत्रा पवार यांना 96 हजार 560 मते मिळाली होती. त्यामुळे जय पवार यांचा विजय सोपा नाही, हे स्पष्ट संकेत दिले गेले आहे.

अजित पवार यांचे राजकीय भविष्य ठरणार?

पुणे जिल्ह्यात 21 विधानसभा मतदार संघ आहेत. जिल्ह्यातील मतदारसंघांमध्ये एकूण मतदारांच्या संख्येच्या प्रमाणानुसार चिंचवड विधानसभा मतदारसंघ सर्वात मोठा आहे. पुणे शहरात सहा विधानसभा मतदार संघ आहेत. जिल्ह्यातील या 21 मधून सर्वांचे लक्ष पुन्हा बारामती या विधानसभा मतदार संघावर असणार आहे. हा मतदार संघ आता अजित पवार यांचे राजकीय भविष्य निश्चित करणार आहे. लोकसभेतील पराभवाचा वचपा काढत अजित पवार विधानसभेत पुनरागमन करणार का? बारामती फक्त शरद पवार यांची नाही, अजित पवार यांचीसुद्धा आहे, हे सिद्ध करणार का? या प्रश्नांची उत्तरे येत्या काळातच मिळणार आहे.

'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला
'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला.
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण.
'...तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल', 'मातोश्री'वर ठाकरे काय म्हणाले?
'...तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल', 'मातोश्री'वर ठाकरे काय म्हणाले?.
बाळ्यामामा म्हात्रे शरद पवारांची साथ सोडणार? फडणवीसांची का घेतली भेट?
बाळ्यामामा म्हात्रे शरद पवारांची साथ सोडणार? फडणवीसांची का घेतली भेट?.
एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयातून बाहेर येताच एकच वाक्य म्हणाले...
एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयातून बाहेर येताच एकच वाक्य म्हणाले....
छगन भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार? 'त्या' कोटवरून का होतेय चर्चा?
छगन भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार? 'त्या' कोटवरून का होतेय चर्चा?.
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?.
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच..
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?.