Rajendra Pawar : राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्यास राजेंद्र पवार यांचा नकार; डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार सोहळ्याला अनुपस्थित
गेल्या काही दिवसात या महाराष्ट्रात नेमकी जी अराजकता निर्माण केली जात आहे, त्याला खतपाणी घालणाऱ्यांच्या हस्ते जर पुरस्कार दिला जाणार असेल तर मी त्यांच्या हस्ते हा पुरस्कार कसा स्वीकारावा, असा सवाल अजित पवार यांचे चुलत बंधू राजेंद्र पवार यांनी केला आहे.
बारामती, पुणे : डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार मिळाला याचा आंद आहे. मात्र महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घालणाऱ्या व्यक्तीच्या हातून पुरस्कार नको, म्हणून या पुरस्कार सोहळ्याला अनुपस्थित असल्याची प्रतिक्रिया ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन आणि शरद पवार यांचे पुतणे राजेंद्र पवार यांनी दिली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राज्यपालांवर आक्षेप घेत राजेंद्र पवार (Rajendra Pawar) यांनी पुरस्कार वितरण सोहळ्याला दांडी मारली आहे. शेती आणि शिक्षणक्षेत्रात केलेल्या आजवरच्या कामाबद्दल मला डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार (Dr. Panjabrao Deshmukh Krishiratna Puraskar) हा पुरस्कार दिला जातो. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आनंद होत असल्याचेही ते म्हणाले. या पुरस्काराचे वितरण होत असताना मी तिथे का गेलो नाही, असा जो प्रश्न विचारला जात आहे, त्याची काही कारणे असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
‘हा शिवरायांचा महाराष्ट्र’
ते म्हणाले, की हा महाराष्ट्र शिवरायांचा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे महान रयतेचे राजे या राज्यात होऊन गेले. त्यांनी शेती आणि शेतकऱ्यांसाठी प्रचंड मोठा आदर्श घालून दिला. अगदी राज्य करताना रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लागणार नाही, उद्या शेतात गोंधळ घालू नका डोलकाठ्या हवे असतील तर रयतेला राजी करून घ्या असे आदेश आणि शेतकऱ्यांची काळजी घेण्याचे आदेश त्यांनी आपल्या प्रशासनाला दिले होते हे सर्वांना माहीत आहे. त्यांचा आदर्श आपल्यासमोर आहे. ज्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो, ते पंजाबराव देशमुख यांनी महाराष्ट्राच्या कृषी धोरणाची बिजे रोवली. यानंतरच्या काळात महाराष्ट्राच्या या शेतीमध्ये शेतकऱ्यांनी नक्षत्राची लेणी फुलवली आणि महाराष्ट्र शेतीच्या बाबतीत समृद्धीच्या मार्गाने नेला.
‘मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वीकारणे योग्य झाले असते’
पुढे ते म्हणाले, की मी आजवरच्या आयुष्यात शेती आणि शिक्षणावर काम केले हे मला ओळखणाऱ्या सर्वांनाच माहीत आहे. आपल्याला हेही माहीत आहे, की महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने या महाराष्ट्रात महिला शिक्षणाची कवाडे खुली केली. हे सारे पाहता ज्यांचा आदर्श मिरवतो, ते छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांच्या विचाराने आपण चालतो त्या फुले-शाहू-आंबेडकर आणि हा पुरस्कार ज्या कामासाठी आणि ज्यांच्या नावाने दिला जातो त्याचा विचार करता हा पुरस्कार एखाद्या कृषी कार्यालयात आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वीकारणे योग्य झाले असते.
#Pune : डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार सोहळ्याला अनुपस्थित, पुरस्कारविजेते राजेंद्र पवार काय म्हणाले?#baramati #award #farming #rajendrapawar अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/pJlmGZMLmk pic.twitter.com/Slk8fHee4S
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 2, 2022
‘अराजकतेला खतपाणी’
महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव घालण्याचे प्रयत्न गेल्या काही दिवसात झाले आहेत. ते पद्धतशीरपणे सुरू आहेत. ज्या महान दाम्पत्याने म्हणजे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची कवाडे खुली केली, त्यांच्याविषयी खालच्या पातळीवर जाऊन मत मांडणारे लोक, या महाराष्ट्राचा इतिहास माहीत नसणारे लोक आणि गेल्या काही दिवसात या महाराष्ट्रात नेमकी जी अराजकता निर्माण केली जात आहे, त्याला खतपाणी घालणाऱ्यांच्या हस्ते जर पुरस्कार दिला जाणार असेल तर मी त्यांच्या हस्ते हा पुरस्कार कसा स्वीकारावा? त्याऐवजी हा पुरस्कार कृषी कार्यालयात जाऊन स्वीकारणे मला योग्य वाटेल, असे परखड मत त्यांनी मांडले.