Pune crime : ‘Traditional day’ला विद्यार्थ्याला मारहाण; हिस्ट्रीशीटरसह साथीदार खातायत जेलची हवा, पुण्यात पोलिसांची कारवाई
या मारहाणीच्या प्रकरणामध्ये पोलिसांनी आरोपींवर विविध कलमानंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी पोलिसांच्या पथकाने कारवाई करत चार आरोपींना अटक केली आहे. मुख्य आरोपी विकी चावडे हा हिस्ट्रीशीटर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पुणे : आंबेगाव खुर्द येथील सिंहगड कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणात शुक्रवारी पारंपरिक दिनाच्या (Traditional day) कार्यक्रमात विद्यार्थ्याला मारहाण केल्याप्रकरणी एका हिस्ट्रीशीटर (History sheeter) आणि त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आतापर्यंत विकास उर्फ विकी चावडे (19), साहिल गायकवाड (19), चेतन थोरे (19), मोहन राठोड (19) यांच्यासह चौघांना अटक केली आहे. याप्रकरणी अथर्व चौधरी (19, रा. धनकवडी) यांनी भारती विद्यापीठ पोलीस (Bharti vidyapeeth police) ठाण्यात एफआयआर दाखल केला. चावडे हा हिस्ट्रीशीटर असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हाही दाखल केला आहे. अटक आरोपी आणि आणखी सहा साथीदारांसह तो शुक्रवारी सिंहगड कॉलेजमध्ये गेला होता. दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास त्यांनी तक्रारदार अथर्ववर शिवीगाळ करून हल्ला केला, जो त्याच महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे.
बांबूच्या काठीने बेदम मारहाण
कॉलेजचा भाई असल्याचा दावा करत चावडे आणि त्याच्या साथीदारांनी अथर्वला दुचाकीवर बसण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यांनी त्याला कॉलेजबाहेरील गल्लीत आणले. तक्रारदार अथर्व चौधरी यांनाी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र या सर्वांनी तक्रारदारास दमदाटी केली. एवढेच नाही तर बांबूच्या काठीने बेदम मारहाणही केली. यावेळी तिथे असलेल्या घटनास्थळावरील इतर लोकांनी तसेच दुकानदारांनी मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, मात्र यांनी त्या लोकांनाही अपशब्द वापरत धमकावले.
गुन्हा दाखल
या मारहाणीच्या प्रकरणामध्ये पोलिसांनी आरोपींवर विविध कलमानंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी पोलिसांच्या पथकाने कारवाई करत चार आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या कलम 363, 323, 504, 506, 143, 145, 147, 148 आणि 149 अन्वये गुन्हाही दाखल केला आहे.
दहशत पसरवण्याचा प्रयत्न
आरोपींनी एका विद्यार्थ्याला मारहाण केली, त्याचे कारण क्षुल्लक असले तरी महाविद्याल परिसराच दहशत पसरवणे हा आरोपींचा उद्देश आहे. मुख्य आरोपी विकास उर्फ विकी चावडे हा हिस्ट्रीशीटर आहे. त्याच्यावर आधीच गुन्हे दाखल आहेत. त्यापार्श्वभूमीवर भारती विद्यापीठ पोलीस आता पुढील कारवाई करत आहेत.