कामचुकार कर्मचाऱ्यांवर मोठी कारवाई, निलंबन, बडतर्फ अन् आरोपपत्र
Pune News PMPML suspends : पुणे शहरात कर्मचाऱ्यांवर प्रथमच मोठी कारवाई झाली आहे. यामध्ये बडतर्फी, निलबंनाचाही समावेश आहे. काही जणांवर आरोपपत्र ठेवण्यात आले आहे.
पुणे | 24 जुलै 2023 : पुणे शहरात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांवर मोठी कारवाई झाली आहे. कामात बेशिस्त अन् सतत गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी कारवाई करण्यात आली आहे. त्यात ३६ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले असून तब्बल १४२ जणांवर आरोपपत्र ठेवण्यात आले आहे. तसेच तीन जणांना बडतर्फ करण्यात आले आहे. या कारवाईमुळे कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
कुठे झाली कारवाई
पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रताप सिंह यांनी नुकताच पदभार घेतला. त्यानंतर त्यांनी धडक कामाला सुरुवात केली. आधी स्वत: त्यांनी पीएमपीच्या बसमधून प्रवास केला. त्यावेळी थांब्यावर गाडी रिकामी असताना थांबवली जात नसल्याचा अनुभव त्यांना आला. बसमध्ये बसून प्रवाशांशी त्यांनी संवाद साधला. त्यानंतर पीएमपीचे बस थांबे आच्छादित करण्यासाठी पब्लिक प्राइवेट पार्टनरशिपच्या माध्यमातून करार केला. एकीकडे प्रवाशांसाठी सुविधा सुरु केल्या असताना कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचे काम सुरु केले आहे.
कर्मचाऱ्यांवर अशी कारवाई
कार्यालयात सतत गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांचा त्यांनी शोध घेतला. त्यानंतर गैरहजर राहणाऱ्या ३६ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. तसेच गंभीर आरोप असलेल्या तिघांवर बडतर्फीची कारवाई केली. यामध्ये दोन चालक आणि एक वर्कशॉपमधील कर्मचारी आहे. हे तिघे कोणतीही सूचना न देता गैरहजर राहिले.
१४२ कर्मचाऱ्यांवर आरोपपत्र
पीएमपीच्या १५ आगारांतील १४२ कर्मचाऱ्यांवर आरोपपत्र ठेवण्यात आले. ज्या १४२ जणांना नोटीस दिली आहे त्यात ७८ कंडाक्टर तर ६४ चालक आहेत. या सर्वांना नोटीस काढून आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहे. पीएमपीचे अध्यक्ष सचिंद्र सिंह यांनी केलेल्या या कारवाईमुळे अनेक वाहक व चालकांचे धाबे दणाणले आहेत.
अध्यक्ष सचिंद्र सिंह यांच्याकडून सुरु असलेल्या या कारवाईचे पुणेकरांकडून स्वागत होत आहे. यामुळे पुणे शहरातील वाहतूक अधिक चांगली होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा
चालकाने बस थांबवली नाही, तो व्यक्ती बससाठी धावत होतो, मग संदेश आला अन् चालकाचे धाबे दणाणले