Rain : राज्यात पावसाचा मोठा ब्रेक, विदर्भापासून पाऊस परतणार
IMD Weather forecast : राज्यात पावसाने दडी मारली आहे. ऑगस्ट महिना सुरु झाल्यापासून राज्यात पाऊस नाही. परंतु आता वातावरण बदलण्याची चिन्ह निर्माण झाली आहे. राज्यात पाऊस आता परतणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
पुणे | 17 ऑगस्ट 2023 : अधिकमास पूर्ण होऊन गुरुवारपासून श्रावण महिना सुरु झाला. यंदा श्रावण महिन्यात अधिकमास आल्यामुळे श्रावणासारखाही पाऊस दिसला नाही. राज्यात आणि देशात पावसाने दडी मारली. पावसाचा हा गेल्या 1972 नंतरचा सर्वात मोठा ब्रेक आहे. यामुळे शेतकरी वर्गही चिंतेत आला आहे. परंतु आता वातावरणात बदल होत आहे. विदर्भात पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असून त्यानंतर राज्यात पाऊस परतणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता संपणार आहे.
विदर्भात पाऊस परतणार
राज्यात 1972 मध्ये सर्वाधिक पावसाचा खंड पडला होता. त्यावेळी 18 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान पाऊस नव्हता. आता जुलैपर्यंत कोसळणारा पाऊस ऑगस्ट महिन्यात दिसलाच नाही. यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून सर्वच जण पावसाची वाट पाहत आहे. परंतु आता वातारवण बदलत आहे. विदर्भात शुक्रवारी यलो अलर्ट दिला आहे. विदर्भातून हा पाऊस मध्य महाराष्ट्राकडे येणार आहे. त्यामुळे पावसाची वाट पाहणाऱ्या नागरिकांची आणि शेतकऱ्यांची चिंता मिटणार आहे.
यंदा सर्वात कमी पाऊस
राज्यात यंदा आतापर्यंत सर्वात कमी पाऊस झाला आहे. यंदा मान्सून उशिरा दाखल झाल्यामुळे जून महिना जवळपास कोरडा गेला. काही भागांत जूनच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस झाला. त्यानंतर जुलै महिन्यात मात्र राज्यात सर्वत्र पाऊस झाला. यामुळे धरणांमध्ये साठा वाढला. विदर्भ आणि कोकणात अतिवृष्टी झाली. परंतु ऑगस्ट महिन्यापासून पावसाने पुन्हा दडी मारली. आता 18 ऑगस्टनंतर राज्यात पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच19 आणि 20 ऑगस्टला विदर्भासाठी यलो अलर्ट दिला आहे.
बंगालच्या उपसागरात ढग
बंगालच्या उपसागरात ढग निर्माण झाले आहे. यामुळे विदर्भात पावसाची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील अनेक धरणांमध्ये जलसाठा झाला आहे. परंतु उजनी धरण रिकामे आहे. दुसरीकडे नीरा नदी कोरडी आहे. यामुळे इंदापूर तालुक्यातील पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. उजनी धरणामध्ये केवळ १३ टक्के पाणीसाठा झाला आहे. यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी चिंता निर्माण झाली आहे.