शरद पालवे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे : राज्यातील 147 कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर होत आहे. या निवडणुकीत अनेकांचा विजय झाला आहे. तर अनेकांना धक्का बसला आहे. या निवडणुकीत धक्का बसलेल्यांमध्ये सत्ताधारी पक्षातील आमदार, खासदार आणि मंत्र्यांचा समावेश आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेनेचे नेते संजय राठोड, संजय गायकवाड, भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील, शिवाजीराव कर्डिले, निलय नाईक, राजा मुंडे, पंकजा मुंडे, जयदत्त क्षीरसागर, आमदार रवी राणा आणि काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांना मोठा धक्का बसला आहे. तर काँग्रेसच्या यशोमती ठाकूर, धीरज देशमुख, संग्राम थोपटे, राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे, प्राजक्त तनपुरे आणइ भाजपच्या समाधान आवताडे यांना गड राखता आले आहेत.
दिग्रस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मंत्री संजय राठोड यांना धक्का बसला आहे. दिग्रस बाजार समितीवर महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. संजय देशमुख आणि माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन महाविकास आघाडीला 18 पैकी 14 जागा मिळाल्या आहेत. तर 4 जागीच संजय राठोड गटाचे संचालक आले निवडून आले आहेत.
बुलढाणा बाजार समितीती महाविकास आघाडीने 18 जागांपैकी 12 जागा जिंकल्या आहेत. या निवडणुकीत शिंदे गट आणि भाजप युतीला अवघ्या 6 जागांवर विजय मिळाला आहे. ठाकरे गटचे जालिंधर बुधवत यांनी पुन्हा एकदा विजयाचा झेंडा फडकवला आहे. तर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना मोठा धक्का बसला आहे.
नगरच्या राहुरी बाजार समितीत आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. खा.सुजय विखे पाटील, माजी आमदार शिवाजी कर्डीले यांना तनपुरेंनी चांगलाच शह दिला आहे. राहुरी बाजार समितीत तनपुरे गटाने 18 पैकी 16 जागा जिंकत विजय मिळवला आहे. त्यांनी विखे आणि कर्डिले गटाचा पराभव केला आहे. गेल्या 20 वर्षांपासून तनपूरे गटाची राहुरी बाजार समितीवर एकहाती सत्ता आहे. विखे – कर्डीले गटाचे सोसायटी मतदारसंघातून दोन सदस्य निवडून आले आहेत.
यवतमाळ- पुसद कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी मंत्री मनोहरराव नाईक आणि आमदार इंद्रनिल नाईक यांचे वर्चस्व स्थापन झाले आहे. आज झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लोकनेते मनोहर नाईक पॅनलचे सर्व 18 उमेदवार निवडून आले आहेत. या निवडणुकीत युवा आमदार इंद्रनिल नाईक यांच्या नेतृत्वामध्ये भाजप प्रणित आघाडीचा सुपडा साफ झाला.
बीडमध्ये राष्ट्रवादीचे आमदार संदीप श्रीरसागर आणि भाजपचे नेते जयदत्त क्षीरसागर यांच्या पॅनलमध्ये थेट लढत होती. यावेळी संदीप क्षीरसागर यांनी 18 पैकी 15 जागा जिंकून काकांना आस्मान दाखवलं आहे. या निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर यांचा मोठा पराभव झाला आहे. जयदत्त क्षीरसागर यांची बाजार समितीतील 40 वर्षाची सत्ता उलटली आहे. या विजयानंतर राष्ट्रवादी आमदार संदीप क्षीरसागर यांनी जल्लोष केला. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप आणि संदीप क्षीरसागर यांनी जल्लोष केला. गुलाल उधळून कार्यकर्त्यांनी दोघांनीही खांद्यावर घेत आनंदाला वाट मोकळी करून दिली.
गेवराई बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ झाला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्वच 18 उमेदवार विजयी झाले. राष्ट्रवादीचे नेते अमरसिंह पंडित यांनी गड राखला. तर भाजप आमदार लक्ष्मण पवार यांच्या पॅनलचा दारुण पराभव झाला.
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार रवी राणा यांना मोठा धक्का बसला आहे. रवी राणा यांचे मोठे भाऊ सुनील राणा यांचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत रवी राणांच्या शेतकरी पॅनलचाही झाला सुपडा साफ झाला आहे. या निवडणुकीत आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीने 18 पैकी 18 जागा जिंकल्या आहेत.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना आपल्या गृह जिल्ह्यात म्हणजे भंडाऱ्यात मोठा पराभव पत्कारावा लागला आहे. भंडाऱ्यात भाजपने जोरदार मुसंडी मारत तब्बल 14 जागांवर विजय मिळविला. काँग्रेसला 4 जागांवर विजय संपादन करता आला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासाठी बाजार समितीची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपशी हातमिळवणी करून काँग्रेसचे नाना पटोले यांना त्यांच्या गृह जिल्ह्यातचं सत्तेपासून दूर ठेवत काँग्रेसचा पराभव केला.
चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत 18 पैकी 12 जागांवर भाजपा आणि काँग्रेस समर्थित शेतकरी सहकार परिवर्तन पॅनलला मिळाल्या आहेत. तर काँग्रेस (खा. बाळू धानोरकर गट) समर्थित शेतकरी सहकार पॅनलला अवघ्या 06 जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत खासदार बाळू धानोरकर यांना मोठा धक्का तर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या युतीचा विजय झाला आहे. स्थापनेपासून काँग्रेसकडे असलेली चंद्रपूर बाजार समिती भाजपच्या ताब्यात आहे.