पिंपरी चिंचवड, पुणे : उमेदवार कोण आहे, याचा आम्ही विचार करत नाही. तो पार्टीचा निर्णय असेल. उमेदवार निवडून आणणे हे आमचे काम आहे, असे वक्तव्य भाजपा नेत्या माधुरी मिसाळ (Madhuri Misal) यांनी केले आहे. त्या पिंपरी चिंचवड येथे बोलत होत्या केंद्रीय आदिवासी राज्यमंत्री रेणुका सिंग (Renuka Singh) या लोकसभा प्रवास योजनेंतर्गत शिरूर लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. 14, 15 आणि 16 सप्टेंबर असा तीन दिवसांचा हा दौरा असणार आहे. मात्र या दौऱ्यामुळे शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao) यांचे टेन्शन मात्र वाढले आहे. शिवाजी आढळराव शिरूर लोकसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत. तीन वेळा आढळराव हे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहिले होते. त्यामुळे आढळराव शिरूर लोकसभा मतदारसंघातून इच्छुक असलेले उमेदवार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना शिरूर लोकसभा मतदारसंघ हे उद्धव ठाकरे सोडणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यामुळेच आढळरावांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानुसार शिरूर लोकसभा निवडणूक प्रभारी आमदार माधुरी मिसाळ यांनी पत्रकार परिषद घेत 2024 लोकसभा निवडणुकीत भाजपाचाच उमेदवार येथे निवडून येईल, असे जाहीरदेखील केले आहे.
माधुरी मिसाळ यांच्या या वक्तव्यानंतर आता भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात वितुष्ट निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे समर्थक माजी खासदार शिवाजी आढळराव यावर काय भूमिका घेतात, हेही पाहावे लागणार आहेत. कारण उमेदवारी मिळवण्यासाठीच त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता.
भाजपा उमेदवाराला विजयी करण्याची जबाबदारी आमची आहे. त्यासाठी बूथ पातळीवर आम्ही काम करतो. मात्र आमच्या युतीतील उमेदवार मतदारसंघात असेल तरी त्याच्यासाठीही आम्ही काम करतो. पक्ष मजबूत होण्याकरिता आमचे प्रयत्न आहेत. निवडणूक कोण लढवेल हे आम्ही ठरवत नाही, ते पार्टी ठरवेल. कोण कुठली जागा लढवेल, हे आत्ताच सांगू शकत नाही, असेही त्या म्हणाल्या.