“राष्ट्रवादीचे टिंगरे यांची निष्क्रिय आमदार म्हणून ओळख”; भाजपने या आंदोलनाची खिल्ली उडवली
सुनील टिंगरे यांना साडे तीन वर्षे एकही मोठं विकास काम केले नाही. त्यामुळे सुनील टिंगरे यांची निष्क्रिय आमदार म्हणून ओळख आहे अशी टीकाही मुळीक यांनी केली आहे.
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांना प्रशासनाकडून आपल्या मतदार संघावर अन्याय केला जात आहे. आपल्या मतदार संघात जाणीवपूर्वक विकास कामं राबविली जात नसल्याचे सांगत सुनील टिंगरे यांनी आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे आमदार सुनील टिंगरे सध्या जोरदारपणे चर्चेत आले आहेत. त्यांच्या या आंदोलनामुळे त्यांनी साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. पुणे जिल्ह्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील विविध मूलभूत प्रश्नांसाठी आमदार सुनील टिंगरे यांनी उपोषण पुकारले आहे.
या उपोषणासंदर्भात टिंगरे यांनी या पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना निवदेन देऊन या आंदोलनाची त्यांना माहिती करून दिली होती.
आमदार सुनील टिंगरे यांनी उपोषण का पुकारले आहे याबाबत बोलताना म्हणाले की, वडगाव शेरीत नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विकासकामांसाठी अनेकदा निवेदन देऊनसुद्धा या प्रश्नावर कोणताही उपाय प्रशासनाकडून सुचवण्यात आला नव्हता.
सुनील टिंगरे म्हणाले की, मतदार संघातील पोरवाल रोड वाहतूक कोंडी, एअरफोर्स जागेतील ते धानोरी रोड, नदीकाठचा प्रलंबित रस्ता, विश्रांतवाडी चौकातील बुद्धविहार स्थलांतरित करणे, नगर रोड वाहतूक कोंडी, लोहगावचा पाणी प्रश्न, खंडोबा माळरोड व इतर डीपी रोड, सिद्धार्थनगर झोपडपट्टी पुनवर्सन, धानोरी लक्ष्मी टाऊनशीप ते लक्ष्मी स्मशानभूमी रोड, धानोरी पेलेडीयम रोडच्या रस्त्याची दुरुस्ती अशी विविध विकास कामं करण्यासाठी आमदार सुनील टिंगरे यांनी उपोषण पुकारले आहे मात्र या उपोषणाची भाजपकडून खिल्ली उडवण्यात आली आहे.
त्यांच्या उपोषणावर भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी जोरदार टीका केली आहे. टिंगरेचे उपोषण म्हणजे एक नौटंकी असून त्यांचं ते अपयश असल्याचेही सांगण्यात आले आहे.
सुनील टिंगरे यांना साडे तीन वर्षे एकही मोठं विकास काम केले नाही. त्यामुळे सुनील टिंगरे यांची निष्क्रिय आमदार म्हणून ओळख आहे अशी टीकाही मुळीक यांनी केली आहे.