पुणे | 9 ऑक्टोंबर 2023 : लोकसभेच्या 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. राजकीय पक्षांकडून मतदार संघांची बांधणी केली जात आहे. उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. भाजप विरोधात ‘इंडिया’ आघाडी एकत्र आली आहे. परंतु भाजपनेही निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. भाजपकडून ‘मिशन 2024’ सुरु झाले आहे. आता अजित पवार यांच्या बारामतीमध्ये लोकसभेची तयारी भारतीय जनता पक्षाकडून सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी बैठकांचे सत्रही सुरु आहे.
बारामती लोकसभा मतदार संघातील इंदापूरमध्ये भाजपाच्या सुपर 100 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत भाजपचे मिशन 2024 संदर्भात चर्चा करण्यात आली. त्यासाठी बारामती लोकसभा मतदार संघातील कार्यकर्ते घराघरात पोहचणार आहे. केंद्र शासनाच्या योजनांची माहिती दिली जाणार आहे. तसेच महाविजय 2024 अंतर्गत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा लवकरच बारामती लोकसभा मतदार संघात दौरा होणार आहे, असा विश्वास भाजप युवा मोर्चाच्या पुणे जिल्हाध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांनी व्यक्त केला.
बारामती मतदार संघातून पुढचा खासदार भाजपचा असणार आहे, असे अंकिता पाटील यांनी सांगितले. मिशन बारामतीसाठी भाजप सज्ज आहे. यासाठी बारामती लोकसभा मतदार संघातील प्रत्येक तालुक्याचा आढावा घेतला जात आहे. त्याअंतर्गत इंदापूर विधानसभा मतदारसंघातील सुपर 100 पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. अजित पवार भाजपसोबत येण्यापूर्वीपासून भाजपने या मतदार संघावर लक्ष केंद्रीत केले आहे.
भाजपने मिशन 2024 ची तयारी प्रत्येक मतदार संघात सुरु केली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार भाजपसोबत आले आहे. त्यांचे या मतदार संघावर वर्चस्व आहे. यामुळे ही जागा त्यांना सोडणार की नाही? हा प्रश्न असताना भाजपकडून तयारी जोरात सुरु झाली आहे. बारामती मतदार संघातून शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे उमेदवार असणार आहे. मात्र, भाजप महायुतीचे उमेदवार कोण असणार? हे अद्याप निश्चित नाही.