Ajit Pawar | अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा, अमित शाह यांनी पुण्यात घेतली महत्वाची बैठक
Ajit Pawar | पडद्यामागे काय घडतय?. पुण्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अमित शाह हे पुण्यामध्ये मदनदास देवी यांच्या अंत्यदर्शनासाठी आले आहेत.
पुणे : पुण्यामध्ये जोरदार राजकीय घडामोडी घडत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुण्यामध्ये आहेत. रात्री उशिरा अमित शाह पुण्यात दाखल झाले. पुण्याच्या जे.डब्ल्यू मेरियट हॉटेलमध्ये एक महत्वाची राजकीय बैठक झाली. अमित शाह हे पुण्यामध्ये मदनदास देवी यांच्या अंत्यदर्शनासाठी आले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह सरकार्यवाह मदनदास देवी यांचं काल पुण्यात निधन झालं. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत.
मदनदास देवी यांच्या अंत्यदर्शनासाठी अमित शाह पुण्यात आले असले, तरी त्या निमित्ताने राजकीय गाठी-भेटी सुरु आहेत.
जे.डब्ल्यू मेरियट हॉटेलमध्ये महत्वाची बैठक
पुण्याच्या जे.डब्ल्यू मेरियट हॉटेलमध्ये एक महत्वाची बैठक झाली. या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. या तिन्ही नेत्यांसोबत अमित शाह यांनी चर्चा केली. नेमक्या कुठल्या मुद्यांवर ही चर्चा झाली, त्या बद्दल माहिती मिळू शकलेली नाही.
कुठल्या मुद्यांवर चर्चा
अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. राष्ट्रवादीच्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी जोरदार चर्चा होती. शिवसेना-भाजपा आमदारांचे मंत्रिमंडळ विस्ताराकडे लक्ष होते. पण तो विस्तार अजून झालेला नाही.
पुण्यात राजकीय घडामोडींना वेग
त्याशिवाय राज्याच्या राजकारणात सध्या अजित पवार मुख्यमंत्री होणार अशी चर्चा सुरु आहे. अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची काय चर्चा होते? त्या बद्दलच चित्र लवकरच स्पष्ट होईल. पुण्यात मात्र आज राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मदनदास देवी यांच्या अंत्यदर्शनासाठी भाजपाचे दिग्गज नेते पुण्यात पोहोचले आहेत. सरसंघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंत्यदर्शनाला उपस्थित राहणार आहेत.