Pimpri Chinchwad Ashish Shelar : भारनियमनाला राज्य सरकारचा नियोजनशून्य कारभार जबाबदार, आंदोलन करणार; आशिष शेलारांचा इशारा
आधी अघोषित भारनियमन होते. आता तर मंत्र्यांनी अधिकृत केले आहे. तीन पक्ष आणि त्यात नसलेला समन्वय याचे दुष्परिणाम महाराष्ट्र भोगत आहे, अशी टीका भाजपा नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केली आहे.
पिंपरी चिंचवड : राज्यात भारनियमन (Load Shedding) विषय जोरात आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. आधी अघोषित भारनियमन होते. आता तर मंत्र्यांनी अधिकृत केले आहे. तीन पक्ष आणि त्यात नसलेला समन्वय याचे दुष्परिणाम महाराष्ट्र भोगत आहे, अशी टीका भाजपा नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केली आहे. वीजप्रश्नावर पिंपरी चिंचवडमध्ये ते बोलत होते. यासंबंधी भाजपा आक्रमक असून आता आंदोलनही (Agitation) करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले, सरकारचा नियोजनशून्य कारभार वीजटंचाईस कारणीभूत आहे. या भारनियमनावर सर्व आदळ-आपट केंद्राच्या नावाने सुरू आहे. भारनियमनासारखी परिस्थिती निर्माण करण्यात आली, आमचा थेट आरोप आहे. देखभाल दुरुस्ती उन्हाळ्याआधी करता येते. ती का नाही केली. कोळशाच्या देशभराच्या उचलमध्ये तुम्ही स्टॉक घ्या असे सांगण्यात आले होते. त्यावेळेस महाराष्ट्र सरकारने का नाही भूमिका घेतली, असा सवाल त्यांनी केला.
‘टक्केवारीचा प्रकार सुरू’
पुढे ते म्हणाले, की मागणी आणि पुरवठा यात टंचाई आणि टक्केवारी असा प्रकार सुरू आहे. सरकार टंचाई निर्माण करत आहे. यात टंचाई निर्माण करायची आणि खासगी कंपन्यांनाकडून वीज घ्यायची. देखभाल दुरुस्तीसाठी वीज बंद केली. त्यात 27 केंद्रे बंद करण्यात आली. सरकारी खात्यात हजारो कोटींची थकबाकी आणि सामन्याकडून थकले की वीज कट करायची हा कुठला कारभार, असा सवाल यावेळी त्यांनी केला.
‘आम्ही नियोजन केले’
सरकारी खात्याने वीजबिले भरली नसतील तर संबंधित खात्यातील वीज किती वेळ बंद ठेवणार, असे विचारत जाणूनबुजून हे सर्व होत असल्याचे ते म्हणाले. आता याचप्रकरणी उद्यापासून राज्यभरात टप्याटप्याने आंदोलन होणार आहे. तीन पक्ष आणि त्यात नसलेला समन्वय याचे दुष्परिणाम महाराष्ट्र भोगत आहे. शेतकऱ्यांकडून 48 हजार कोटी वीजबिले येणे असतानासुद्धा आमच्या काळात कंपन्या नफ्यात गेल्या. कारण आम्ही नियोजन केले, असे ते म्हणाले.