भाजपला अण्णांची भीती?, बागडे राळेगणसिद्धीत; दीड तास खलबतं

| Updated on: Dec 21, 2020 | 11:19 PM

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत जाऊन केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. (bjp leader haribhau bagade meets Anna Hazare at ralegan siddhi)

भाजपला अण्णांची भीती?, बागडे राळेगणसिद्धीत; दीड तास खलबतं
Follow us on

राळेगणसिद्धी: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत जाऊन केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांनी राळेगणसिद्धीत जाऊन आण्णांशी चर्चा केली. अण्णांच्या आंदोलनाची धास्ती घेतल्यानेच या गाठीभेटी सुरू केल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. (bjp leader haribhau bagade meets Anna Hazare at ralegan siddhi)

काल राळेगणसिद्धीमध्ये पंजाबचे शेतकरी आले होते. शेतकऱ्यांनी थाळी वाजवून अण्णा हजारे यांच्यासमोर निदर्शने केली. त्यानंतर त्यांनी अण्णांशी चर्चा केली. यावेळी अण्णांनी शेतकरी आंदोलनाला आपला सुरुवातीपासूनच पाठिंबा असल्याचं सांगतानाच आंदोलकांना बळ देण्यासाठी दिल्लीत येऊन आंदोलन करण्याचे आश्वासनही अण्णांनी या आंदोलकांना दिलं होतं. त्यामुळे आधीच शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे तोंडचे पाणी पळालेल्या केंद्र सरकारची अण्णांनी आंदोलन केल्यास कोंडी होण्याची शक्यता आहे. अण्णांनी दिल्लीत आंदोलन केल्यास हे आंदोलन आणखी तापून देशभरातील शेतकरी त्यात सामील होण्याची भीती असल्यानेच भाजप नेत्यांनी अण्णांची भेट घेण्यास सुरुवात केल्याचं सूत्रांनी सांगितलं.

विधानसभेचे माजी अध्यक्ष, आमदार हरिभाऊ राठोड यांनी आज अण्णांची भेट घेतली. या दोघांमध्ये सुमारे दीड तास बंद दाराआड खलबतं झाली. कृषी कायद्याच्या अनुषंगानेच या भेटीत अधिक चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. मात्र, अण्णा आणि बागडे यांनी या भेटीबाबत काहीही बोलण्यास नकार दिला. त्यामुळे या दीड तासाच्या भेटीनंतर अण्णा काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

अण्णांना कायद्याचं पुस्तक भेट

दुपारी 1 च्या दरम्यान राळेगणसिद्धी येथे येऊन हरिभाऊंनी अण्णांशी दीड तास चर्चा केलीये. यावेळी अण्णांना कृषी कायद्याचे मराठी भाषेतील पुस्तक भेट देण्यात आलं. यावेळी राज्यसभेचे खासदार डॉ. भागवत कराड, माजी जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड आणि सुनील थोरातही उपस्थित होते. अण्णांनी उपोषणाचा निर्णय घेऊ नये, अशी विनंती या नेत्यांनी अण्णांना केल्याचं सूत्रांनी सांगितलं.

अण्णांचं एकदिवसीय उपोषण

8 डिसेंबर रोजी दिल्लीतील शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली होती. त्यावेळी अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी इथं शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत एक दिवसीय लाक्षणिक उपोषणही केलं होतं. त्यावेळी केंद्र सरकारनं शेतकरी आंदोलनावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी अण्णांनी केली होती.

“केंद्र सरकारनं यापूर्वी दोन वेळा लेखी आश्वासन देऊनही ते पाळले नाही. केंद्र सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाने प्रश्न सुटले नाहीत. तर दिल्लीत माझ्या आयुष्यातील शेवटचं आंदोलन शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी करेन”, असा इशारा अण्णांनी उपोषणावेळी दिला आहे. (bjp leader haribhau bagade meets Anna Hazare at ralegan siddhi)

 

संबंधित बातम्या:

अण्णा हजारे शेतकरी आंदोलनात सहभागी होणार?

अण्णा हजारे शेतकरी आंदोलनात सहभागी होतील असं वाटत नाही- गडकरी

दिल्ली बॉर्डरवर पोहोचले हजारो शेतकरी, आज मोठ्या आंदोलनाची शक्यता

(bjp leader haribhau bagade meets Anna Hazare at ralegan siddhi)