BREAKING | पुण्यात राजकीय घडामोडींचा उद्रेक, रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात भाजपचं शिष्टमंडळ पोलीस आयुक्तालयात
कसबा (Kasba By-Election) आणि चिंचवड (Chinchwad) पोटनिवडणुकीसाठी प्रचाराची वेळ संपली असली तरी राजकीय घडामोडी काही कमी होताना दिसत नाहीय. विशेष म्हणजे भाजपचं शिष्टमंडळ थेट पोलीस ठाण्यात गेलं. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलंय.
पुणे : कसबा (Kasba By-Election) आणि चिंचवड (Chinchwad) पोटनिवडणुकीसाठी प्रचाराची वेळ संपली असली तरी राजकीय घडामोडी काही कमी होताना दिसत नाहीय. या पोटनिवडणुकीत भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांकडून पोलिसांसमोर पैशांचं वाटप केलं जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी केला. याच आरोपांवरुन त्यांनी आज कसबा गणपतीसमोर उपोषण पुकारलं. तब्बल पाच तास हे आंदोलन चाललं. अखेर पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतलं. पण त्यांच्या या उपोषणानंतर भाजप नेतेही आक्रमक झाले.
भाजपचं शिष्टमंडळ आज पुणे पोलीस आयुक्तालयात दाखल झालं. या शिष्टमंडळाने रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. रवींद्र धंगेकर यांनी प्रचाराची वेळ संपलेली असताना खोटे आरोप करत आंदोलनाच्या माध्यमातून निवडणुकीचा प्रचार केला. याशिवाय त्यांनी आचारसंहितेचा भंग केलाय, अशी तक्रार भाजपच्या शिष्टमंडळाने पुणे पोलीस आयुक्तांकडे केली.
भाजपच्या शिष्टमंडळाची नेमकी भूमिका काय?
रवींद्र धंगेकर यांच्याविषयी तक्रार दाखल केल्यानंतर भाजप शिष्टमंडळ पोलीस आयुतक्तालयाबाहेर आलं तेव्हा त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “आम्हाला बोगस मदतानाची शक्यता वाटते. वोटिंग कार्ड तिथे बोगस आहेत. त्यामुळे कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतदान होऊद्या, अशी आम्ही मागणी केलीय”, अशी प्रतिक्रिया या शिष्टमंडळाने दिली.
“कसबा निवडणुकीत बोगस मतदार आणून बोगस मतदान करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या उमेदवारामार्फत सुरु आहे. आम्ही हा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाहीत. आम्ही पोलिसांना असे केंद्र सांगितले आहेत जिथे बोगस मतदानाची तयारी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी केलेली आहे. त्याठिकाणी अधिकचा पोलीस बंदोबस्त लावला पाहिजे. तिथे कुठल्याही पद्धतीत बोगस मतदान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे ही आमची पहिली मागणी आहे”, असं भाजप नेते जगदीश मुळीक म्हणाले.
“आमची दुसरी मागणी अशी आहे की, काल पाच वाजता प्रचाराचा वेळ संपला. पण तरीही केवळ उपोषणाचा बनाव करुन एकप्रकारे निवडणुकीचा प्रचार करण्यात आला. महाविकास आघाडीच्या उमेदवारावर कारवाई झाली पाहिजे. निवडणूक अर्ज रद्द झाला पाहिजे. त्यासाठी आम्ही निवडणूक आयोगाकडे जाऊन तक्रार करणार आहोत”, अशी प्रतिक्रिया भाजपच्या शिष्टमंडळाने दिली.