ललित पाटील याच्यासाठी ससूनच्या डीनला भाजप मंत्र्याचा फोन?
Lalit Patil Drug Case | ललित पाटील ड्रग्स प्रकरणात सर्व बाजूने पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. त्याचवेळी या विषयावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहे. पुणे येथील काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी मोठा आरोप केला आहे. ससूनचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांना भाजपचा एक मंत्री फोन करत होता, असा दावा त्यांनी केला.
योगेश बोरसे, पुणे | 3 नोव्हेंबर 2023 : पुणे येथून ससून रुग्णालयातून फरार झालेला ललित पाटील येरवडा कारागृहातील कैदी होता. 2 ऑक्टोबर रोजी तो फरार झाला. त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्या अटकेनंतर या प्रकरणात राजकीय आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी ससूनचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांना भाजपचा एक मंत्री फोन करत होता. त्यामुळे ललित पाटील याला पंचतारांकीत सुविधा मिळाली. या प्रकरणात ललित पाटील याच्याबरोबर संजीव ठाकूर यांनाही सहआरोपी करावे, अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली. तसेच ललित पाटील सोबत संजीव ठाकूर याची नार्को टेस्ट केल्यास मोठमोठी नावे बाहेर येतील, असा दावाही ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलतांना केला.
काय म्हणाले रवींद्र धंगेकर
ललित पाटील याला ससून रुग्णालयामध्ये ठेवण्यासाठी एक मंत्री ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता संजीव ठाकूर यांना फोन करत होता. या मंत्र्याचे गुन्हेगारी विश्वात चांगले संबंध आहेत. गुन्हेगारांसोबत तो मंत्री वावरताना दिसतो. गुन्हेगारी विश्वात तो काम करत असतो. निवडणूक जिंकण्यासाठी तो गुन्हेगारांची मदत घेतो. ललित पाटील आणि त्याचे संबंध सर्वांना माहीत आहे, असे रवींद्र धगेकर यांनी म्हटले. त्या मंत्र्यांचे नाव विचारले असताना ते स्पष्ट सांगण्यास त्यांनी नकार दिला. परंतु तो मंत्री भाजपचा असल्याचा दावा त्यांनी केला.
संजीव ठाकूर यांनाही मोकोका लावा
ललित पाटील याला मोकोका लावण्यात आला आहे. त्याचबरोबर संजीव ठाकूर यांना सहआरोपी करून त्यांच्यावरही मोकोका लावा, असे रवींद्र धंगेकर यांनी म्हटले आहे. तसेच या दोघांची नार्को चाचणी केल्यानंतर अनेक मोठे नावे बाहेर येतील. रुग्णालयाचे डीन स्वत: कधी रुग्णावर उपचार करत नाही. त्यांच्या खालचे डॉक्टर रुग्णावर उपचार करत असतात. परंतु ललित पाटील याच्यावर स्वत: संजीव ठाकूर यांनी उपचार केले. त्याला एक बॅरेटीक हा आजार दाखवला. परंतु हा आजार नाही. तो चरबी कमी करण्यासाठीचा प्रकार आहे. ठाकूर यांनी ललित पाटील याच्याकडून प्रचंड पैसे घेतले आहे. सोलापूरमध्ये १५ कोटींचा भ्रष्टाचार संजीव ठाकूर यांनी केला होता. त्यानंतर त्यांची बदली झाली, असा आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला.