मुंबई, पुणे शहरात बाँबस्फोटाची धमकी, फोनवरुन धमकी देत काय मागितले?
bomb blast in mumbai and pune threat : मुंबई अन् पुणे शहरात बाँबस्फोट घडवण्याची धमकी मिळाली आहे. एका फोन कॉलरने मुंबई पोलिसांना ही धमकी दिली आहे. त्यात त्याने आपली मागणीही केली आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.
कृष्णा सोनारवाडकर, मुंबई : मुंबई पोलिसांना आलेल्या एक फोनमुळे खळबळ उडाली आहे. या फोन करणाऱ्या व्यक्तीने मुंबई अन् पुणे शहरात बाँबस्फोट करण्याची धमकी दिली आहे. फोन कॉलरने मुंबई पोलिसांकडे आपली मागणीही केली आहे. मागणी पूर्ण झाल्यावर आपण आपल्या माणसांसोबत विदेशात निघून जाऊ, असेही त्याने म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा फोन करणारा कोण आहे? याचा शोधही पोलिसांना लागला आहे. पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली आहे.
काय म्हटले धमकी देणाऱ्याने
मुंबई पोलिसांना पुन्हा एकदा धमकीचा कॉल आलाय. फोन करणाऱ्या व्यक्तीने मुंबई अन् पुण्यात बॉम्बस्फोट करण्यात येणार असल्याच्या म्हटले आहे. यासंदर्भात मुंबई पोलिस सूत्रांनी सांगितले की कॉलरने गुरुवारी सकाळी 10 वाजता मुंबई पोलिस कंट्रोलला फोन केला. त्याने म्हटले की, 24 जून रोजी संध्याकाळी 6:30 वाजता मुंबईतील अंधेरी आणि कुर्ला भागात बॉम्बस्फोट करणार आहे.
काय केली मागणी
24 जून रोजी संध्याकाळी 6:30 वाजता मुंबईतील अंधेरी आणि कुर्ला या ठिकाणी बॉम्बस्फोट करणार आहे. परंतु आपणास दोन लाख रुपयांची गरज आहे, ही रक्कम मिळाल्यानंतर आपण बॉम्बस्फोट थांबवू शकतो, असे त्या फोन करणाऱ्या व्यक्तीने म्हटले आहे.
फोन करणाऱ्या कॉलरने पुढे दावा केला की, पुणे शहरातही बॉम्बस्फोट होणार आहेत, तो स्वत: हा स्फोट घडवून आणणार आहे, त्यासाठी त्याला दोन कोटी रुपये मिळाले आहेत. परंतु आपणास फक्त दोन लाख रुपये मिळाल्यास आपण आपल्या माणसांसोबत मलेशियाला निघून जाऊ, असा दावा कॉलरने केला आहे.
फोन आला तरी कोठून
मुंबई पोलिसांना हा धमकीचा फोन आल्यानंतर पोलीस सक्रीय झाले. त्यांनी फोन कोठून आला? याचा शोध सुरु केला होता. कॉलरने हा फोन उत्तर प्रदेशातील जौनपूर येथून केल्याचे तपासात समोर आले आहे. अंबोली पोलिसांनी या संदर्भात आयपीसीच्या कलम ५०५(१)(बी), ५०५(२) आणि १८५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
आरोपीस केली अटक
मुंबई आणि पुण्यात बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्या आरोपीस पोलिसांनी केली अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी आरोपीला उत्तरप्रदेशमधील जौनपूरमधून अटक केली आहे. आरोपीचे नाव दरवेश राजभर असे असल्याची माहिती मिळाली आहे.