पुणे शहराच्या पाणी प्रश्नाची उच्च न्यायालयाने घेतील दखल, प्रशासनला काय दिले आदेश?
पुणे शहर आणि जिल्ह्यातील पाणी पुरवठ्यासंदर्भात उच्च न्यायालयाने पावले उचलली आहेत. न्यायालयाने पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेला आदेश दिले आहेत. या आदेशामुळे पुणे शहर व जिल्ह्यातील पाणी प्रश्न सुटण्यासाठी मदत होणार आहे.
प्रदीप कापसे, पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्याला भेडसवणाऱ्या पाणी प्रश्नावर प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नव्हती. यामुळे अखेरी या प्रकरणाची दखल मुंबई उच्च न्यायालयाने घेतली. पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेला मोठा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाच्या या आदेशामुळे पुणे शहर व जिल्ह्यातील पाणी प्रश्न सुटण्यासाठी मदत होणार आहे. पुणे शहरातील पाणीटंचाईसंदर्भात नागरिकांच्या अनेक तक्रारी होत्या. यामुळेच यासंदर्भात २०१६-१७ मध्ये उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली होती. त्यावर न्यायालयाने निर्णय दिला आहे.
काय आहे न्यायालयाचा निर्णय
पुण्यातील पाणी प्रश्नाची मुंबई उच्च न्यायालयाकडून दखल घेतली गेली आहे. पाण्याच्या प्रश्नांवर विशेष समिती स्थापन करण्याचा आदेश न्यायालयाने पुणे मनपा, पिंपरी चिंचवड मनपा आणि पुणे जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला दिला आहे. या समितीमध्ये पाणी प्रश्नी नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी दोन्ही महानगरपालिकांनी विशेष समितीची फेररचना करावी, समितीमध्ये मनपा आयुक्त, विभागीय आयुक्त, मुख्य शहर अभियंता, जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाचे सचिव आणि पाणीपुरवठा संबंधित लोकांचा समावेश करावा, असे न्यायालयाने म्हटले आहे.
कोणी केली होती याचिका
सण २०१६-१७ मध्ये पुणे शहरातील पाणी टंचाईसंदर्भात जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली होती. सत्या मुळे या वकिलांनी ही याचिका दाखल केली होती. त्यावेळी न्यायालयाच्या आदेशानुसार समिती स्थापन केली होती. परंतु या समितीच्या चार बैठकाच झाल्या. ही बाब सत्या मुळे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार पुण्याच्या समितीची फेररचना आणि पिंपरी चिंचवड व ग्रामीण भागातील नागरिकांना भेडसवणाऱ्या पाणी प्रश्नासाठी स्वतंत्र विशेष समिती स्थापन करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
पुणे मनपाची हेल्पलाईन
पीएमसी प्रशासनाने (PMC Administration) 24 तास हेल्पलाईन सुरु केली आहे. यावरुन कधीही तुम्हाला तक्रार (Complaints) करता येणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून शहरातील विविध भागांत पाणीपुरवठा केला जातो. त्यावेळी अनेक ठिकाणी काही तांत्रिक समस्या निर्माण होतात. त्यात नियमित पाणी न येणे, कमी दाबाने पाणीपुरवठा होणे, जलवाहिनीतून पाणी वाहून जाणे, जलवाहिनी डॅमेज होणे यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेत. त्यामुळे अनेक वेळा परिसरातील नागरिक रस्त्यांवर येऊन आंदोलनही करतात . यामुळे मनपाने 24 तास हेल्पलाईन सेवा सुरु केली आहे. त्यात नागरिक आपल्या तक्रारी करु शकतात. 020-25501383 या क्रमांकावर लोकांना तक्रारी करता येणार आहे.