pune News | पुणे जिल्ह्यात दोन दिवस बैलगाडा शर्यतीची धूम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार दोन दिवस बंद
pune News | बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने मे महिन्यातच परवानगी दिली. त्यानंतर पुन्हा बैलगाडा शर्यतीचा थरार रंगू लागला. आता पुणे जिल्ह्यात दोन दिवस बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी लाखोंचे बक्षिस देण्यात येणार आहे.

पुणे | 26 सप्टेंबर 2023 : बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाकडून परवानगी दिल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात शर्यतीचा थरार सुरु झाला. आता पुणे जिल्हा बैलगाडा मालक प्रतिष्ठान संघटनेच्या वतीने 22 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर भोसरी येथील बैलगाडा शर्यत आयोजित केली आहे. घाटात गणेश फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. या बैलगाडा शर्यतीमध्ये चौदाशेपेक्षा अधिक बैलगाडा मालकांनी आपला सहभाग निश्चित केला आहे. स्पर्धेत नऊ लाख 51 हजार रुपयांचे भरघोस बक्षीस ठेवण्यात आले आहे.
मोशी बाजार समिती राहणार बंद
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे मोशी येथील उपबाजार समितीचे मार्केट दोन दिवस बंद राहणार आहे. अनंत चतुदर्शीच्या दुसऱ्या दिवशी दरवर्षी उपबाजार बंद राहतो. यावेळी शुक्रवारी आणि साप्ताहिक सुट्टीमुळे शनिवारी मोशी येथील मार्केट यार्ड बंद राहणार आहे. या दिवसात शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीस आणू नये, असे आवाहन बाजार समितीकडून करण्यात आले आहे.
मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल
चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकबोटे यांच्यासह इतर तिघांवर पुणे येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्येश्वर मंदिराजवळील अतिक्रमण हटवण्यासाठी भाजपासह हिंदुत्ववादी संघटनांनी 4 सप्टेंबर रोजी पुणे महानगरपालिकेबाहेर आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान एकबोटे यांनी चिथावणीखोर भाषण केल्याची तक्रार दाखल झाली होती. यामुळे एकबोटे सोबत कुणाल कांबळे, किरण शिंदे आणि विशाल पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.




प्रदीप कुरुलकर प्रकरणी सुनावणी २७ सप्टेंबर रोजी
पाकिस्तानी महिलेच्या हनी ट्रॅपमध्ये अडकलेले डीआरडीओचे माजी संचालक प्रदीप कुरुलकर यांच्या जमीन अर्जावर पुणे न्यायालयात सुनावणी सुरु आहे. यावेळी त्यांच्या वकिलांनी कुरुलकर यांनी गोपनीय माहितीबाबत कोणताही भंग केला नाही, तसेच पाकिस्तानी माहिलेस त्यांनी जी माहिती दिली ते गोपनीय नाही, ही सर्व माहिती सोशल मीडिया आणि विविध साईटसवर उपलब्ध असल्याचा दावा केला. डॉ. कुरुलकर यांच्याकडून अॅड ॠषीकेश गानू यांच्यामार्फत हा युक्तीवाद झाला. आता ही सुनावणी 27 सप्टेंबर रोजी होणार आहे.
पुणे पोलिसांना रुटमार्च
गणेशोत्सव आणि ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील खडकवासला पोलिसांनी रूटमार्च काढला. खडकवासला गाव, बाजारपेठ मार्गे मुख्य सिंहगड रस्त्यावरुन पोलिसांनी हा रूटमार्च काढला. यावेळी सोशल मीडियावर कुठल्याही आक्षेपार्ह पोस्ट शेअर करू नये, जातीय सलोखा कायम ठेवावा, असे आवाहन पोलिसांनी केले.