मराठा आरक्षणासंदर्भात महत्वाचा निर्णय कधी? मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून अपडेट
maratha reservation | मराठा आरक्षणासंदर्भात राज्यात सर्वत्र आंदोलन सुरु आहे. एकीकडे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केले आहे. त्याचवेळी राज्यातील गावागावांमध्ये राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. आता मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
प्रदीप कापसे, पुणे | 29 ऑक्टोंबर 2023 : मराठा आंदोलनाचे लोण राज्यातील गावागावात पोहचले आहे. जालनामधील अंतरवली गावात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केले. त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. त्याचवेळी गावागावात साखळी उपोषण सुरु झाले आहे. राज्यातील अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. मराठा आंदोलक सर्वत्र आक्रमक झाले आहे. त्याचवेळी मराठा आरक्षणासंदर्भात महत्वाचा निर्णय सोमवारी होणार आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. मंत्री मंडळाच्या उपसमितीची सोमवारी बैठक होणार आहे. त्यानंतर यासंदर्भातील माहिती देण्यात येणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देणार
राज्य शासन मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकेल, असे आरक्षण देणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. त्यांनी मनोज जरांगे आणि इतर मराठा संघटनांना हाथ जोडून विनंती आहे की जाळपोळ, गाड्यांची तोडफोड करू नका. तरुणांनी आत्महत्या करू नका. राज्य शासनाकडून तुम्हाला नक्कीच न्याय मिळेल. मराठा समाजास कायमस्वरुपी टिकणारे आरक्षण देण्यासाठी काम सुरु आहे. यापूर्वी एक वर्ष आरक्षण दिले होतं पण ते कोर्टात टिकले नाही.
ग्रामपंचायत सदस्यांचे राजीनामे
मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील कजगाव ग्रामपंचायतीच्या तीन सदस्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. पल्लवी पाटील, शोभाबाई बोरसे आणि समाधान पवार या ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामे दिले आहेत. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे कजगाव शहरप्रमुख दिनेश पाटील यांनी देखील आपला पदाचा राजीनामा दिला आहे.
नांदेडमध्ये राजकीय नेत्यांचे फोटोही आठवले
नांदेडात मराठा आंदोलकांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि माजी मंत्री डी.पी.सावंत यांचे फोटो हटवले आहेत. नांदेड तालुक्यातील पासदगाव/काकांडी या गट ग्रामपंचायतीत लावलेले चव्हाण आणि सावंत यांचे फोटो गावकऱ्यांनी हटवले आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण नाही तोपर्यंत कोणत्याही नेत्याचा आदर सन्मान होणार नसल्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.