IAS अधिकारी अनिल रामोड एक कोटी मागे घेत होता 10 लाख, CBI तपासात धक्कादायक बाब उघड
CBI raids IAS Anil Ramod : पुणे येथे आयएएस अधिकाऱ्यावर सीबीआयने दोन दिवसांपूर्वी छापा टाकला. या छाप्यात IAS अधिकारी अनिल रामोड याच्याकडे सहा कोटींची रोकड मिळाली. त्यात दोन हजारांच्या नोटा आहेत.
पुणे : अपर विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड याच्याकडे सीबीआयने शुक्रवारी छापा टाकला. या छाप्यात 8 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी CBI ने त्याला अटक केली. पुणे शहरात सीबीआयकडून थेट झालेल्या या कारवाईनंतर राज्यभरातील महसूल अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. विभागीय आयुक्तालयाच्या इतिहासात प्रथमच सीबीआयसारख्या केंद्रीय यंत्रणेने छापा टाकला आहे. सीबीआयने बड्या अधिकाऱ्याला अटक केल्याने मोठी खळबळ उडाली. सीबीआयमधील डीआयजी सुधीर हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. आता सीबीआय तपासात धक्कादायक माहिती उघड होत आहे.
कशी घेतली जात होती लाच
अपर विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड याचे लाच घेण्याचे एक सूत्र ठरले होते. भूसंपादनाचा वाढीव मोबदला देण्यासाठी १० टक्के लाच त्याच्याकडून घेतली जात होती. म्हणजेच भूसंपादनाचे मूल्य १ कोटी वाढवले तर १० लाख रुपये मला द्यावे लागतील, असे त्याच्याकडून सांगितले जात होते. सीबीआयने केलेल्या रेकॉर्डिंगमध्ये ही बाब स्पष्ट झाली आहे.
रामोड यांच्या सर्व निर्णयांची चौकशी?
राष्ट्रीय महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीचे संपादन केले जाते. अनेकवेळा शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळत नाही. यामुळे भू संपादनातील वाद त्यांच्याकडे असणाऱ्या लवादाकडे येतात. त्यातून जमीन मालक व राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांचे म्हणणे ते ऐकून घेऊन न्यायनिवाडा करतात. आता त्याच्या या निर्णयाची चौकशी होण्याची शक्यता आहे. त्याने ज्यांना वाढीव मोबदला दिला, ती सर्व प्रकरणे चौकशीच्या कक्षेत येणार आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले की, यासंदर्भात विभागीय आयुक्तालयाकडून अहवाल तयार करण्यात येणार आहे. तो राज्य शासनाकडे पाठविला जाईल. राज्य शासनकडून त्यावर योग्य निर्णय घेईल.
सीबीआय कोठडीत रवानगी
अपर विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड याला शनिवारी न्यायालयात हजर केले होते. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांनी १३ जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली. सीबीआयाने पाच दिवासांची कोठडी मागितली होती. दरम्यान सीबीआयला अनिल रामोड याच्याकडे जी सहा कोटींची रक्कम मिळाली आहे त्यात दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा आहेत.
अनिल रामोड आयएएस
अनिल रामोड आयएएस अधिकारी आहेत. डॉ. अनिल रामोड हा भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहे. महसूल विभागात ते कार्यरत होते. त्यांची नियुक्ती अपर विभागीय आयुक्त म्हणून झाली आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन प्रकरणात सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील लवाद म्हणून ते काम करत आहेत.