Pune GBS : पुण्यात GBS ची दहशत, केंद्रीय पथकाला गावकऱ्यांनी का घेराव घातला?
Pune GBS : पुण्यातील किरकिटवाडी, आंबेगाव, नांदेड गाव या भागात GBS आजारचे सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. या आजारावर उपयुक्त असलेल्या इंजेक्शनचा काळा बाजार होत आहे.

पुण्यात सध्या GBS आजाराने दहशत निर्माण केली आहे. जीबीएसच्या फैलावासाठी दूषित पाण्याचा स्त्रोताला कारणीभूत मानलं जातय. GBS मुळे वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन केंद्र सरकारने आज सात तज्ज्ञांच पथक पुण्यात पाठवलं. या केंद्रीय पथकाला आज पुण्याच्या नांदेड गावात गावकऱ्यांनी घेराव घातला. गावकऱ्यांनी त्यांच्या गाडीसमोर ठिय्या मांडला. हे केंद्रीय पथक विहिरीची, पाण्याची पाहणी न करताच परतत होतं, असा गावकऱ्यांचा आरोप आहे. त्यासाठी गावकऱ्यांनी पथकाच्या अधिकाऱ्यांभोवती गराडा घातला. पाहणी करायला आलात, पण पाहणी न करताच निघालात का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला.
त्यावर महिला अधिकाऱ्याने सांगितलं की, “पाहणी न करता निघालो हे कोणी ठरवलं. जे काही काम होईल, त्याचे अपडेट देऊ” पुण्यातील किरकिटवाडी, आंबेगाव, नांदेड गाव या भागात GBS आजारचे सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. या आजारावर उपयुक्त असलेल्या इंजेक्शनचा काळा बाजार होत असल्याने पुणे महानगर पालिकेने याबाबत उपाययोजना केल्या आहेत.
पुण्यात किती रुग्ण?
या आजारात मृत्यूचे प्रमाण अतिशय कमी असल्याने नागरिकांनी घाबरुन जाऊ नये असे आवाहन सरकारने केले आहे. दरम्यान आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज पुण्यातील दिनानाथ मंगेशकर आणि ससून रुग्णालयात जाऊन रुग्णांची भेट घेतली. पुणे परिसरात 111 रुग्ण आढळले आहेत. रुग्णात 33 महिला आहेत. या रुग्णांवर विविध 16 रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पिण्याच्या पाण्याचे स्रोत तपासले जात आहेत. पाणी उकळून पिणे गरजेचे आहे.
घरोघरी रुग्ण शोध मोहीम
जीबीएस अर्थात गुलेन-बॅरे सिंड्रोम या आजारावरील उपचारांचा महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत समावेश करण्यात आला आहे. या आजारामुळे पुण्यात आणीबाणी निर्माण झाली असताना आता राज्याच्या अन्य भागातही जीबीएस रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे दूषित पाण्याचे नमूने गोळा केले जात आहेत. तसेच घरोघरी रुग्ण शोध मोहिम सुरु करण्यात आली आहे.