Misal pe charcha : कोल्हापूरच्या थेट पाइपलाइनच्या घोषणेचं काय झालं? सतेज पाटलांसह काँग्रेसवर बरसले चंद्रकांत पाटील
कोल्हापूरकरांना दाखवलेले पाइपलाइनचे स्वप्न पालकमंत्र्यांना पूर्ण करता आले नाही, त्यामुळे त्या घोषणेचे काय झाले, असा सवाल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मंत्री सतेज पाटील यांना विचारला आहे.
पुणे/कोल्हापूर : विद्यमान पालकमंत्र्यांनी आघाडी सरकारच्या काळात कोल्हापूरकरांसाठी (Kolhapur) थेट पाइपलाइनची (Pipeline) व्यवस्था केली नाही, तर इथून पुढे निवडणूक लढणार नाही, अशी घोषणा केली होती. पण अद्याप कोल्हापूरकरांना दाखवलेले हे स्वप्न पालकमंत्र्यांना पूर्ण करता आले नाही, त्यामुळे त्या घोषणेचे काय झाले, असा सवाल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मंत्री सतेज पाटील यांना विचारला आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपा उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारार्थ शिवाजी पेठेतील पद्माराजे उद्यान येथे शहर भाजपाच्या वतीने ‘मिसळ पे चर्चा’चे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. यावेळी पक्षातील विविध नेते आणि कार्यकर्त्यांनी विविध राजकीय विषयांवर चर्चा केली. चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटील आणि काँग्रेसचा यावेळी समाचार घेतला.
‘काँग्रेसला महिला लोकप्रतिनिधी का देता आले नाहीत’
चंद्रकांत पाटील म्हणाले, की आघाडी सरकारच्या काळात विद्यमान पालकमंत्री राणाभीमदेवी थाटात म्हणत होते, की कोल्हापूरकरांचे थेट पाइपलाइनचे स्वप्न पूर्ण केले नाही, तर भविष्यात निवडणूक लढणार नाही. पण कोल्हापूरकरांचे हे स्वप्न अजूनही पूर्ण झाले नाही. त्यामुळे त्या घोषणेचे काय झाले, असा सवाल त्यांनी यावेळी विचारला. ते पुढे म्हणाले, की भारतीय जनता पार्टीत सर्वाधिक महिला लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे छत्रपती ताराराणींच्या कोल्हापूर शहरातून काँग्रेसला 50 वर्षांच्या काळात महिला लोकप्रतिनिधी का देता आले नाहीत, असा प्रश्न विचारून पाच वर्षांत देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात कोल्हापुरात झालेल्या विकासकामांचा पाढाच यावेळी पाटील यांनी जनतेसमोर मांडला.
मान्यवरांची उपस्थिती
माजी खासदार धनंजय महाडिक, सत्यजित कदम, महेश जाधव, प्रा. जयंत पाटील , अजिंक्य चव्हाण, बाजीराव चव्हाण, अजित ठाणेकर, अशोक देसाई, विजयसिंह खाडे पाटील, सुदर्शन सावंत, मुरलीधर जाधव, अजित हारुगले, भारती जोशी, कविता पाटील यांच्यासह इतर मान्यवर आणि परिसरातील नागरिक यावेळी उपस्थित होते.