पवार कुटुंबात मतभेद आहेत की नाही?; चंद्रकांत पाटील यांच्या विधानाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजाच्या शेवटच्या माणसाच्या सुखासाठी काम केलं आहे. राहुल गांधी यांनी काय सिद्ध केलंय? मोदींनी अनेक गोष्टी करून दाखवल्या आहेत, असं सांगतानाच पाचही राज्यात भाजपला मोठं आणि चांगलं यश मिळेल, असा विश्वास भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. ते मीडियाशी बोलत होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी वेगवेगळ्या विषयावर प्रतिक्रिया व्यक्त केली.
अभिजीत पोते, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 15 नोव्हेंबर 2023 : दिवाळी पाडव्यानिमित्ताने संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलं होतं. बारामतीतील राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या गोविंद बाग या निवासस्थानी दिवाळी पाडवा साजरा करण्यात आला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार की नाही यावर जोरदार चर्चा होती. मात्र, संध्याकाळी उशिरा अजितदादा गोविंद बागेत आले. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार यांच्या राजकीय चुली वेगळ्या असल्या तरी पवार कुटुंब एकत्र असल्याचं स्पष्ट झालं आहे. परंतु, असं असलं तरी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी पवार कुटुंबाबत एक मोठं विधान केलं आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
कितीही मतभेद झाले तरी सणासुदीला एकत्र येणं हेच पवार कुटुंबाचे वैशिष्ट्य आहे. मतभेदानंतर पवार कुटुंब वेगळं होतं. पण अशा कार्यक्रमाला नक्की एकत्र येतात. पवार कुटुंब एकत्रित आलं म्हणून मागचे मतभेद विसरले असं नाही. मतभेद अजूनही तसेच आहेत, असं मोठं आणि धक्कादायक विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अजित पवार गोविंद बागेत जाणारच असतात. ते जातात. दोन मोठे पवार जे आहेत अजित पवार आणि शरद पवार त्यांच्या डोक्यात काय सुरू आहे हे घटना घडल्याशिवाय कळत नाही, असंही ते म्हणाले.
आंदोलनं होतील, पण तोडगा निघणार नाही
मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रासाठी दौरा करणार आहेत. त्यावरही चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं आहे. मी आरक्षण उपसमितीचा अध्यक्ष असताना अनेक वेळा बैठकीमध्ये जरांगे पाटील भेटले आहेत. सध्या अनेक समाजाच्या मनात तिरस्कार निर्माण होत आहे. सर्व समाजाच्या नेत्यांनी बोलताना काळजी घेतली पाहिजे. समाजामध्ये तेढ निर्माण करणं आपलं काम नाही. मराठा समाजाला तीन टप्प्यात आरक्षण मिळण्याची प्रोसेस सुरू आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळालाच पाहिजे याच भूमिकेचा मीही आहे. अनेक वेळेला कुणीतरी कोर्टात गेलं आणि याबाबत गडबड झाली. पण यावेळी टिकणारं आरक्षण देण्यास सरकार सकारात्मक आहे. कुणबी दाखले देण्यावरही काम सुरू आहे. टोकाच्या टाईम टेबलची मांडणी केल्याने आंदोलनं होतील. पण तोडगा निघणार नाही, असा टोला लगावतानाच मराठा समाजाला लॉजिकल आणि कोर्टात टिकणारं आरक्षण दिलं जाईल, असंही ते म्हणाले.
ते सांगतात, आम्ही सांगत नाही
महाविकास आघाडीचं जागा वाटप झाल्याची चर्चा आहे. महायुतीचं जागा वाटप झालं का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांना विचारण्यात आला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. अशी बातमी अधूनमधून सोडायची असते. असं झालं असेल तर आनंद आहे. आमचं देखील जागा वाटप झालं आहे. फरक फक्त इतकाच आहे. आम्ही सांगत नाही. ते सांगतात, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
राम मंदिर राजकीय अजेंडा नाही
राम मंदिर हा आमचा राजकीय अजेंडा नाही. राम मंदिर ही आमची श्रद्धा आहे. ज्यासाठी 550 वर्ष संघर्ष झाला. राम मंदिर हा आमच्या राजकारणाचा विषय नाही. मुंबईत घोषणा दिली असेल तर ती नजीकच्या काळात मंदिराचे उद्घाटन असल्याने दिली असेल, असंही ते म्हणाले.