माझ्याविरुद्ध गलिच्छ भाषेत लिखाण, चंद्रकांतदादा थेट रश्मी ठाकरेंना पत्र लिहिणार
"शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'दैनिक सामना'मध्ये माझ्याविरोधात गलिच्छ भाषेत लिखाण केले" असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे
पुणे : ‘सामना’मध्ये माझ्याविरोधात गलिच्छ भाषेत लिखाण केले. त्यामुळे ‘सामना’च्या संपादक रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांना पत्र लिहिणार आहे, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी संताप व्यक्त केला. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Sanjay Raut) यांना आलेल्या ईडी नोटिसीविषयी लिहिताना अग्रलेखात आपल्याविषयी वापरलेली भाषा अशोभनीय असल्याची तक्रार चंद्रकांतदादांनी केली आहे. ‘डोक्यात सडकी हवा आणि पार्श्वभागात घुसलेला बाण, हेच तुमचे भविष्य’ अशा शब्दात चंद्रकांत पाटलांवर ‘सामना’तून बोचरी टीका करण्यात आली होती. (Chandrakant Patil to write letter to Rashmi Thackeray for derogatory language in Saamana Editorial)
“शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘दैनिक सामना’मध्ये माझ्याविरोधात गलिच्छ भाषेत लिखाण केले. संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस होती, त्यावेळी त्यांची भाषा शोभनीय नव्हती. मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे सामनाच्या संपादक आहेत. संपादक म्हणून ही त्यांची भाषा असू शकत नाही, मग अग्रलेखात ती कशी? त्यामुळे त्यांना मी पत्र लिहिणार आहे” असं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं.
सामनाच्या अग्रलेखात काय होते?
‘ईडी’ च्या बाबतीत ज्यांना ‘घटना’ आठवते त्यांनी राज्यपालनियुक्त जागांबाबतही घटनेचे स्मरण ठेवले पाहिजे, असा टोला सामनाच्या अग्रलेखातून चंद्रकांत पाटील यांना लगावण्यात आला होता. ‘ईडी’ वगैरेचा वापर करुन महाराष्ट्रातील सरकार पाडता येईल, या अंधश्रद्धेतून आता बाहेर पडले पाहिजे, असंही राऊतांनी म्हटलं. डोक्यात सडकी हवा आणि पार्श्वभागात घुसलेला बाण, हेच तुमचे भविष्य, अशा शब्दात राऊत भाजपवर बरसले. (Chandrakant Patil to write letter to Rashmi Thackeray for derogatory language in Saamana Editorial)
‘चंद्रकांत पाटलांना घटनेची इतकी फिकीर कधीपासून लागून राहिली? तुम्हाला घटना मान्य नाही काय, हा प्रश्न त्यांनी राजभवनाच्या दारात उभे राहून जोरात विचारायला हवा. घटनेची सगळ्यात जास्त पायमल्ली सध्या कुठे होत असेल तर ती घटनेच्या तथाकथित रखवालदाराकडून. मागच्या जून महिन्यात राज्यपालनियुक्त 12 जागा रिकाम्या झाल्या. त्या जागांची शिफारस राज्याच्या मंत्रिमंडळाने केली. राज्य मंत्रिमंडळाच्या शिफारशी मान्य करणे हे राज्यपालांना बंधनकारक असल्याचे आपली घटनाच सांगते. मग इतके महिने उलटून गेले तरी राज्यपालनियुक्त जागा रिकाम्या का ठेवल्या?, असा सवालही राऊत यांनी विचारला होता.
“ग्रामपंचायत निवडणुकीत विजय मिळवणार”
नवीन वर्षात 22 तारखेला ग्रामपंचायत निवडणुकीत विजय मिळवणार, असा विश्वास चंद्रकांतदादांनी व्यक्त केला. मुंबई महापालिका यांची जहागिरी झाली आहे. मात्र दिल्लीतून मुंबई पालिकेच्या निवडणुकीसाठी लक्ष दिले जाईल. 22 तारखेला ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालानंतर मुंबईसह इतर पालिकांवर विजय मिळवणं हे आमचं ध्येय असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.
इन्फ्रास्ट्रक्चर, मुंबईच्या समस्यांकडे दुर्लक्ष आणि पैसा जनरेट करणे एवढंच लक्ष्य राहिलं आहे काही जणांचं. त्यामुळे मुंबई पालिका जिंकणे हे तर लक्ष्य आहेच आणि 2022 नंतर 2024 मधील लोकसभा-विधानसभेला किती दिवस राहतात, असा टोलाही चंद्रकांत पाटलांनी लगावला.
“काँग्रेसचा विरोध संभाजी महाराजांच्या नावाला आहे का?“
औरंगाबादचं संभाजीनगर असं नामांतर करणं हा आमचा राजकीय मुद्दा नाही, निवडणुकीचाही नाही, तर भावनिक मुद्दा आहे. काँग्रेसचा विरोध संभाजी महाराजांच्या नावाला आहे का? समजा असेल तर औरंगजेबाचं तरी नाव कशाला? ते पहिले हटवा, अशी मागणी चंद्रकांत पाटलांनी केली. सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरेंनी मागणी केली, तुम्ही गोधड्या वाळवत आहात म्हणता तर आता करा नामांतर, असंही ते म्हणाले.
संबंधित बातम्या :
डोक्यात सडकी हवा आणि पार्श्वभागात घुसलेला बाण, हेच तुमचे भविष्य; सामनाच्या अग्रलेखातून राऊत बरसले
(Chandrakant Patil to write letter to Rashmi Thackeray for derogatory language in Saamana Editorial)