आम्ही त्यांना भाऊ म्हणायचो, भाऊंच्या जाण्याने आम्ही पोरके झालो…. भाजप नेत्याला अश्रू अनावर
भाजपचे ज्येष्ठ नेते, खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनावर सर्वच राजकीय पक्षातून शोक व्यक्त केला जात आहे. भाऊंच्या निधनाने आमचा आधारवड गेला, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे.
पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते, खासदार गिरीश बापट यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. त्यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त होत आहे. गिरीश बापट हे मनमिळावू स्वभावाचे होते. अजातशत्रू होते. त्यांचे सर्वच राजकीय पक्षात घरोब्याचे संबंध होते. त्यामुळेच सर्वच राजकीय पक्षातून त्यांच्या निधनावर शोक व्यक्त होत आहे. खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. आम्ही आमचा आधार गमावला. त्यांना आम्ही भाऊ म्हणून हाक द्यायचो आणि ते मोठ्या भावासारखे धावून यायचे. भाऊंच्या जाण्याने आम्ही पोरके झालो, अशी भावूक प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे. यावेळी बावनकुळे यांना अश्रू अनावर झाले.
जवळचा मित्र गेला : खडसे
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनीही गिरीश बापट यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. खडसे आणि गिरीश बापट एकाच पक्षात होते. दोन्ही नेत्यांनी अनेक वर्ष एकत्र काम केलं आहे. या आठवणींनाही खडसे यांनी उजाळा दिला आहे. गिरीश बापट यांचं निधन झालं. गेल्या अनेक वर्षाचा माझा सहकारी आज काळाने हिरवून घेतला. 35 वर्ष मी गिरीश बापट यांच्यासोबत काम केलं. माझा जवळचा मित्र आज गेला, अशा शब्दात एकनाथ खडसे यांनी शोक व्यक्त केला आहे.
आम्ही शाळेपासून एकत्र होतो: जावडेकर
गिरीश बापट यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक सच्चा कार्यकर्ता गमावला. शाळेपासून आम्ही एकत्र होतो. 58 वर्षांची ही आमची साथ संपली याचे फार दुःख होत आहे. आमदार, खासदार तसेच महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी उत्तम कामगिरी पार पाडली. सातत्याने पुण्याचे सर्व प्रश्न लावून धरले. आणिबाणीच्या लढाईपासून मोदी सरकारच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्याही त्यांनी पार पाडल्या. त्यामुळे आज असंख्य आठवणी दाटून आल्या आहेत, असं भाजपचे ज्येष्ठ नेते प्रकाश जावडेकर म्हणाले.
भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. आम्ही आधार गमावला. त्यांना आम्ही “भाऊ ” म्हणून हाक द्यायचो आणि ते मोठ्या भावासारखे धावून यायचे. भाऊंच्या जाण्याने आम्ही पोरके झालो. मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो.… pic.twitter.com/TZHTP5SqIN
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) March 29, 2023
जुना सहकारी गेला : भुजबळ
गिरीश बापट यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. अतिशय दुःख झाले. त्यांच्या निधनाने ज्येष्ठ लोकप्रतिनिधी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारे ज्येष्ठ लोकप्रतिनिधी काळाच्या पडद्याआड गेला, अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शोक व्यक्त केला आहे. गिरीश बापट यांनी कामगार चळवळीपासून सुरुवात करत राजकारणात प्रवेश केला. नगरसेवक, आमदार ते खासदार पदापर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. विधिमंडळात काम करणारे ते माझे जुने सहकारी होते. कामगार आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न त्यांनी पोटतिडकीने सोडविले. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुण्यातील समता पुरस्कार सोहळ्यास त्यांनी नेहमीच हजेरी लावली. त्यांच्या निधनाने विधिमंडळातील ज्येष्ठ सहकारी काळाच्या पडद्याआड गेला आहे, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.