अजितदादा…हे षडयंत्र कोणाचे? आता उघड करा…मराठा आरक्षणावर भुजबळ यांचा कोणावर निशाणा
NCP convention in Karjat chhagan bhujbal | आम्ही भाजपसोबत गेलो हे चूक म्हणता तर तुम्ही काँग्रेससोबत गेला हे बरोबर कसे? आम्ही घेतलेला निर्णय बरोबर आहे, हे राज्यातील जनतेने ग्रामपंचायत निवडणुकीत दाखवून दिले आहे, असे छगन भुजबळ यांनी सांगत शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.
कर्जत, पुणे | 1 डिसेंबर 2023 : मराठा समाजाचे ५८ मोर्चे निघाले. पण एक आवाजसुद्धा निघाला नाही. पण हा आवाज सरकारच्या कानात गेला. आता डोळ्यात अश्रू आणणारी परिस्थिती बीडमध्ये निर्माण झाली होती. आमच्या आमदारांची घरे जाळली गेली. पिस्तूल काढले गेले. अजितदादा हे षडयंत्र आहे. ते षडयंत्र उघड करा. त्यामागे कोण आहे ते समोर आणा. सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे. परंतु कोणावर अन्याय होत असेल तर आवाजसुद्धा उठवावा लागणार आहे, असे राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवशीय राष्ट्रीय शिबीर झाले. त्यावेळी ते बोलत होते.
अजित पवार यांचा निर्णय योग्यच
आपणास जास्त संघर्ष आपल्या जुन्या मित्रांसोबत करावा लागत आहे. त्या जुन्या मित्रांनी बदललेल्या परिस्थितीचा विचार करा. पण मी एकच सांगतो अजित पवार यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. दलित समाज, अल्पसंख्याक, ओबीसी, मराठा समाजाला सोबत घ्यावे लागणार आहे. अजित पवार मुख्यमंत्री होणार? हे जनतेच्या मनात आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. फक्त दुसऱ्याच्या आरक्षणास धक्का न लावता मिळाले पाहिजे. मी हे जो बोलत आहे तेच राज्यातील सर्व पक्षीय नेते बोलत होते. दादा आता जातीय जनगणनेची मागणी आपण करायला हवी. इतर कोणी मागणी करण्यापेक्षा आहे.
आम्हीच बरोबर हे जनतेने दाखवून दिले…
एखाद्या पक्षाला आधी हो म्हणून आणि नंतर नाही म्हणने एखाद्या वेळ्यास ठीक आहे. परंतु पुन्हा तेच, तेच का होत आहे. 2004 पासून हेच सुरु आहे. प्रफुल्ल पटेल यांनी काल बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला. हे मलाही माहीत नव्हते. परंतु वारंवार हे कसे करायचे? या शब्दांत छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. तुम्ही केले ते बरोबर आहे. छगन भुजबळ म्हणाले की, आम्ही केले ते चूक कसे? भाजपसोबत जाण्यासाठी सर्वांनी सह्या केल्या. आम्ही भाजपसोबत गेलो हे चूक म्हणता तर तुम्ही काँग्रेससोबत गेला हे बरोबर कसे? आम्ही घेतलेला निर्णय बरोबर आहे, हे राज्यातील जनतेने ग्रामपंचायत निवडणुकीत दाखवून दिले आहे. जनतेच्या शुभेच्छा आपल्याबरोबर आहे. त्यासाठी आपण सर्वांना एकत्र घ्यावे लागणार आहे. ज्या राज्यात शांतता नसेल तेथे उद्योगधंदे कसे वाढणार आहे.