‘ती’ जाहिरात कोणी दिली? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच केला खुलासा

| Updated on: Jun 16, 2023 | 8:14 PM

Eknath Shinde And Devendra Fadanvis : शिवसेनेने दिलेल्या जाहिरातीवरुन राज्यातील राजकारणात चर्चा सुरु झाली आहे. या जाहिरातीमुळे भाजप नाराज झाली होती. परंतु गुरुवारी देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा करत एका जाहिरातीमुळे दोस्ती तुटणार नसल्याचे सांगितले होते.

ती जाहिरात कोणी दिली? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच केला खुलासा
cm eknath shinde
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पुणे : राज्यात उत्कृष्ट मुख्यमंत्री कोण? यासंदर्भात एक सर्वे झाला आहे. त्या सर्वेची जाहिरात शिवसेनेकडून वृत्तपत्रांमध्ये करण्यात आली आहे. या जाहिरातीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे. आतापर्यंत देशात नरेंद्र-महाराष्ट्रात देवेंद्र अशा आशयाच्या जाहिराती दिसत होत्या. मात्र आता देशात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे अशी जाहिरात प्रसिद्ध झाली. त्यात फक्त एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदी यांचा फोटो आहे. त्यावर एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले. ती जाहिरात कोणी दिली, हे सांगितले आहे.

धाडसी निर्णय घेतले

आमच्या सरकारने सर्वांसाठी धाडसी निर्णय घेतले आहे. ही यादी इतकी मोठी आहे की येथे वाचायला वेळ पुरणार नाही. इतिहासात प्रथमच एवढे निर्णय घेतले आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना 6 हजार दिले त्यात राज्य सरकारने हातभार लावत त्यात आणखी 6 हजार भरले. यामुळे आता शेतकऱ्यांना वर्षाचे 12 हजार मिळत आहे. आपलं सरकार येण्यापूर्वी सगळं ठप्प होत, कोरोनात आम्ही सगळं ओपन केले. घाबरून घाबरून राहायला असतो तर कोरोनाने आपल्याला धरलं असतं. आपण राज्यात सर्व सण-उत्सव खुले केले, त्यामुळं कोरोना ही पळून गेला. गेला की नाही? असा टोला उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता एकनाथ शिंदे यांनी लगावला.

हे सुद्धा वाचा

जे बोलतो ते करुन दाखवतो

आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. आत्तापर्यंत बघा आम्ही जे सांगितले ते सगळं पूर्ण करतोय. हे सरकार खोटं नाही. बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल, असे आमचे धोरण आहे. मी रस्त्यावर फिरणारा मुख्यमंत्री आहे. मुंबईत मी नालेसफाई झाली की नाही? हे अगदी स्पॉटवर जाऊन पाहतो. राज्यात कुठं ही गाडी थांबव म्हटलं तरी रस्त्यावर थांबून मी प्रत्येकाला भेटतो. आजवर जगामध्ये असा मुख्यमंत्री तुम्ही कधी पाहिलंय का? यापूर्वी काय झाला ते बोलायचं नाही. पूर्वीचे सरकार घरी होते. आम्ही लोकांच्या दारी जातोय, दोन सरकारमध्ये हा फरक आहे.

इंद्रायणी नदी शुद्धीकरण केलं जाणार

पाणी शुद्धीकरणाचे प्रकल्प उभारण्याच्या सूचना उद्योग मंत्री उदय सामंतांना दिलेल्या आहेत. यानिमित्ताने इंद्रायणी, पवना आणि मुळा नदीचं शुद्धीकरण केलं जाईल. आषाढी वारीच्या पूर्वसंध्येला आळंदीमध्ये इंद्रायणी नदीतील पाण्यावर फेस आला होता. वारकऱ्यांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ माध्यमांनी समोर आणला होता. पिंपरी चिंचवडमधील कंपन्या रसायनयुक्त पाणी नदीत सोडत असल्यानं इंद्रायणी दूषित झाली होती. त्याअनुषंगाने नदीचं शुद्धीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्यात.

ती जाहिरात कोणी दिली

आम्ही एकदम मजबूत आहोत. ही युती एका विचाराने निर्माण झालीये, ती एखाद्या जाहिरातीने तुटेल इतकी ही कच्ची युती नाही. ती जाहिरात एका उत्साही कार्यकर्त्याने प्रसिद्ध केली होती. परंतु आमच्या कामामुळे विरोधक घाबरले आहेत. अकरा महिन्यात युती सरकारने एवढं काम केलं आणखी दीड वर्षात हे चांगलं काम करणार, म्हणून विरोधक काहीही आरोप करतायेत. त्यांना आम्ही कामातून उत्तर देणार. तुम्ही त्याबाबत काहीही चिंता करू नका, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.