पुणे : राज्यात पुढील आठवडाभर मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल. तसेच पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. राज्यात १८, १९ आणि २० एप्रिल रोजी बहुतांश ठिकाणी हजेरी लावणार असल्याचाही हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. पुण्याच्या भोरमध्ये तासभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे गटार अक्षरशः तुंबली. काही भागात गटाराचं पाणी शिरलं. पुणे जिल्ह्यात आंबा उत्पादनाला पावसाचा मोठा फटका बसला. आंब्याचे उत्पादन घटल्याने केवळ ३० टक्केच आंबा बाजारात दाखल झाला. त्यामुळे आंब्याच्या भावात वाढ झाली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील रावेत भागात होर्डिंग कोसळून ४ ते ५ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. काही वेळापूर्वीच वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला होता. तेव्हा, हा होर्डिंग कोसळून यात ८ जण अडकले होते. पैकी ४ ते ५ जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती रावेत पोलिसांनी दिली आहे.
पिंपरी चिंचवड शहरात बहुतांश ठिकाणी वादळी पावसाला सुरुवात झाली. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी झाड उन्मळून पडलीत. तर, वाऱ्यामुळे गाड्या पडल्याचं चित्र दिसत होतं.
रावेत भागात रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. शहरात रस्त्यांवर लावण्यात आलेले बॅनर टराटरा फाटले. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे स्टँडवर ठेवलेल्या गाड्या खाली कोसळल्या होत्या.
नाशिकमध्ये अवकाळी पावसाने पिकांचे मोठं नुकसान केलं आहे. आपातग्रस्तांकडून पीक कर्ज वसुली सक्तीने नको. असे आदेश पालकमंत्री दादा भुसे यांनी पीक पाहणीनंतर दिले. नाशिक जिल्ह्यात गेल्या ४५ दिवसांत ४२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यातील बळीराजा हवालदील झाला.
सातारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला. पाचगणी परिसरातही गारपिटीसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. कोल्हापूरच्या वाकरे गावात पावसाने धुमाकूळ घातला. गारांचा मोठा खच जमा झाला होता. सुमारे ३२ हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे अवकाळी पावसाने हजेरी लावली. आंबा आणि काजू बागायतदार यांचे नुकसान झाले.
एकीकडे उष्णाघाताचे बळी गेले असताना दुसरीकडे पाऊस पडत आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे नागरिकांची तारांबळ उडत असल्याचं चित्र आहे. अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान होत आहे.