दिलेल्या गोष्टी काढत नाही, मी बोललो तर अनेकांच्या अडचणी होतील; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सूचक इशारा
दुपारी बोलताना एमपीएससी ऐवजी निवडणूक आयोग असं मी म्हणालो. माझ्याकडून अनावधानाने ते बोललं गेलं. सध्या निवडणूक आयोग, कोर्ट या गोष्टी जोरात चालू असल्यामुळे असे चुकून म्हटले. आता काही लोकांना निवडणूक आयोगाची एलर्जी झाली आहे.
पुणे : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या देव्हाऱ्यातील धनुष्यबाण दाखवून हा धनुष्यबाण कोणीच हिरावून घेऊ शकत नाही, असं विधान केलं होतं. त्यावेळी उद्धव ठाकरे यांना गलबलून आलं होतं. पण हा धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भेट दिल्याचं समोर आलं आहे. त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारलं असता, मी दिलेल्या गोष्टी काढत नाही. मी बोललो तर अनेकांच्या अडचणी होतील, असा सूचक इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला. ते मीडियाशी संवाद साधत होते.
मी दिलेल्या गोष्टी कधी काढत नाही आणि त्यावर बोलणार नाही. मला बोलायला लावू नका. मी बोललो तर अनेकांची अडचण होईल, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. आम्हाला संपत्तीचा मोह नाही, कधीही नव्हता. आम्हाला कुणाचीही संपत्ती नको. बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे. याउपर आम्हाला बोलायचं नाही, असं शिंदे म्हणाले.
कोर्टाचा अवमान करू शकत नाही
ठाकरे गटाच्या आमदारांना व्हीप बजावणार का? असा सवाल मुख्यमंत्र्यांना करण्यात आला. त्यावर अधिवेशनात व्हीप बजावण्याचं प्रकरण कोर्टात आहे. आम्ही कोर्टाचा अवमान करू शकत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
लोक माझी ऊर्जा
रात्री दोन वाजता मुख्यमंत्री पक्ष कार्यालयात आले होते. त्यामुळे मुख्यमंत्री झोपतात कधी? असा सवाल केला असता मुख्यमंत्री हसायला लागले. हा महाराष्ट्राला आणि मलाही पडलेला प्रश्न आहे. आमचं नवं सरकार आहे. लोक भेटतात, काम करावे लागते. लोक माझी ऊर्जा आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
त्यावेळी परदेशात कोण होतं?
शिंदे गटाचं बंड प्लॅन होता, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला होता. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. इतिहासात मला जायचं नाही. ऑपरेशन वेळी कोण परदेशात होतं? कोण आनंद करत होतं? मला सांगायची गरज नाही, ही वेळ का आली हे सगळ्यांना माहीत आहे. राज्याला माहीत आहे, असंही ते म्हणाले.