संग्राम थोपटे यांचा शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा, काँग्रेसचा मोठा गट फुटणार?
काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधलाय. संग्राम थोपटे यांनी यावेळी खंत देखील व्यक्त करुन दाखवली. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षात खरंच मोठी फूट पडेल का? या प्रश्नाचं उत्तर दिलं.
पुणे | 21 ऑगस्ट 2023 : शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेता केल्यावर नाराजीमुळे काँग्रेसचा एक मोठा गट फुटणार असल्याचा दावा केलाय. त्यावर काँग्रेसचा कुठलाही आमदार फुटणार नसल्याची प्रतिक्रिया काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांनी दिलीय. मात्र त्यांनतर विरोधी पक्षनेता होण्याची इच्छा असूनही त्यांना डावललं जात असल्याचं म्हणत त्यांनी खंत व्यक्त केलीय. काँग्रेस पक्ष नाही तर पुण्यातील राजकीय शक्तीमुळे त्यांना डावललं जात असल्याचा दावा त्यांनी केलाय.
पुणे जिल्ह्यातल्या परकीय शक्तीमुळे मला डावललं जात असल्याचं मोठं वक्तव्य संग्राम थोपटे यांनी केलं. त्यांनी या वक्तव्यातून अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधलाय. “काँग्रेस आमदार फुटणार हा जावई शोध कुठून लागला? मला माहिती नाही, पण कुणाच्या अंर्तगत नाराजीमुळं आमदार फुटतील अशी आत्ता तरी काँग्रेसमध्ये परिस्थिती नाही”, असं संग्राम थोपटे यांनी स्पष्ट केलं.
संग्राम थोपटे यांच्याकडून खंत व्यक्त
“कामं करणाऱ्याला अपेक्षा असते, पद मिळावं, पण काँग्रेसमध्ये निर्णय पक्षश्रेष्ठी घेत असतात. पक्षातील सर्वजण तो निर्णय अंतिम मानत असतात”, असंही संग्राम थोपटे यांनी सांगितलं. “मी विरोधी पक्षनेता पदाची संधी मिळावी म्हणून प्रयत्न करत होतो. आमदार म्हणून सलग तीन वेळा निवडून गेलो आहे. पक्षाची निष्ठा, पक्षाचं धोरण याबाबत आम्ही थोपटे कुटुंबिय कायम काँग्रेससोबत राहिलो आहोत आणि कायम राहू”, अशी भूमिका संग्रमा थोपटे यांनी मांडली.
“कामं करणाऱ्या माणसाला वाटतं, मला संधी मिळाली पाहिजे. मलाही 2019 ला मंत्रीपद मिळेल, अशी अपेक्षा होती. त्यानंतर विधानसभा अध्यक्षपद मिळेल, अशी अपेक्षा होती. आता विरोधी पक्षनेते पद मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र तीही संधी मला मिळाली नाही”, अशी खंत संग्राम थोपटे यांनी व्यक्त केली.
“पुणे जिल्हा म्हटलं कि का डावललं जातंय मला समजत नाही. काँग्रेस पक्षश्रेष्ठी डावलत आहेत, असं नाही. पण पुण्यामध्ये राजकीय शक्ती कुणाची आहे, त्यांच्याकडून डावललं जात आहे”, असा आरोपच संग्राम थोपटे यांनी केला. “पक्षाला वाटतं ते पक्ष ठरवत असतो, पण पुणे जिल्ह्यातल्या परकीय शक्तींचाही यात हस्तक्षेप होत आहे”, असं संग्राम थोपटे म्हणाले.