‘माझ्या जीवाचं काहीही झालं तरी…’; काँग्रेस आमदार संग्राम थोपटे असं का म्हणाले?
"माझ्या वडिलांनी आणि या तालुक्यातल्या जनतेने हा कारखाना उभा केलेला आहे. तो मोडकळीला आला तर मला बघवणार नाही. आजपर्यंत मी तळ हाताच्या फोडाप्रमाणे हा कारखाना जपण्याचं काम केलेलं आहे", असं आमदार संग्राम थोपटे म्हणाले.
काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांच्या राजगड सहकारी साखर कारखान्याचा 80 कोटी रुपयांच्या थकहमीचा प्रस्ताव NCDC कडून रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे संग्राम थोपटे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. गोरगरीब जनतेच्या तोंडातला घास हिरावून घेण्याचा हा प्रयत्न असल्याचं संग्राम थोपटे यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर राजकीय द्वेषापोटी इथे त्याचा विपर्यास होणार असेल, तर यासारखे दुसरे दुःख नाही. जनतेने माझ्या विश्वासावरती कारखान्याची धुरा माझ्या खांद्यावरती दिलेली आहे. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांकर्ता, कारखाना अखंडित सुरू राहण्यासाठी माझ्या जीवाचं काहीही झालं तरी चालेल, पण मी मागे हटणार नाही, अशी प्रतिक्रिया संग्राम थोपटे यांनी ‘Tv9 मराठी’शी बोलताना दिली.
“राजगड सहकारी साखर कारखान्यात 13 हजाराहून अधिक सभासद आहेत. कारखान्याच्या आतापर्यंत 30 गाळप झालेले आहेत. अनेक तालुक्यातले ऊस आतापर्यंत या कारखान्यात गाळपसाठी आलेले आहेत. वर्षभरापासून NCDC कडून कर्ज मिळावं यासाठी पाठपुरावा करत होतो. मागवलेल्या 26 कारखान्यांच्या अर्जाची राज्यातील मंत्री समितीने पाहणी करून 26 पैकी 13 कारखान्यांची नावं NCDC कडे कर्ज मागणीसाठी दिली होती. जूनमध्ये ह्या 13 कारखान्यांच्या कर्ज मान्यतेचे पत्र सहकार विभागाला दिलं होतं. मात्र गेल्या दोन दिवसांपासून काही बातम्या येत आहेत”, असं संग्राम थोपटे म्हणाले.
‘शासनाला माझी विनंती आहे की…’
“मी अनेक वर्ष महाविकास आघाडीचे काम केलयं. संग्राम थोपटेचं राजकीय वैर असेल तर हा भाग वेगळा, पण कारखान्याचे साडेतेरा हजार सभासद, 500 कामगार या सगळ्यांवर अवलंबून असणारे त्यांचे कुटुंब हे महत्त्वाचं आहे. संग्राम थोपटे सोबत तुम्हाला बाकी काय करायचं असेल तर तो भाग वेगळा. सहकारी संस्थेमध्ये एक रोजगार उभा करताना कित्येक वर्ष लागतात. पण एक रोजगार बंद करायला किती वेळ लागतो? शासनाला माझी विनंती आहे असं काही होत असेल तर ते करू नये”, असं आवाहन संग्राम थोपटे यांनी केलं.
‘सर्वसामान्य माणसाला यामध्ये कशाला भरडताय?’
“गोरगरीब जनतेच्या तोंडातला घास हिरावून घेण्याचा हा प्रयत्न आहे”, अशी टीका संग्राम थोपटे यांनी केली. “खडकवासला वगळता सर्वच विधानसभा मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळे यांना मताधिक्य मिळालेलं आहे. माझ्या मतदारसंघातून दोन नंबरचा मताधिक्य त्यांना मिळालेलं आहे. पण संग्राम थोपटेंसोबत तुमचं राजकीय काय असेल तर त्याला वेगळे व्यासपीठ आहे. पण सर्वसामान्य माणसाला यामध्ये कशाला भरडताय? ह्यांचा संसार उघड्यावर पडलेला मला बघवणार नाही”, असा शब्दांत संग्राम थोपटे यांनी क्लेश व्यक्त केला.
‘तर मला बघवणार नाही’
“माझ्या वडिलांनी आणि या तालुक्यातल्या जनतेने हा कारखाना उभा केलेला आहे. तो मोडकळीला आला तर मला बघवणार नाही. आजपर्यंत मी तळ हाताच्या फोडाप्रमाणे हा कारखाना जपण्याचं काम केलेलं आहे. मी फार मोठा आर्थिक सक्षम नसलो तरी बाप जाद्यापासून जे मिळालेल आहे ते पणाला लावून मी कारखाना जिवंत ठेवणार”, असं संग्राम थोपटे म्हणाले.
‘माझ्या जीवाचं काहीही झालं तरी…’
“राजकारणाच्या भूमिका असतात, पण राजकीय द्वेषापोटी इथे त्याचा विपर्यास होणार असेल, तर यासारखे दुसरे दुःख नाही. जनतेने माझ्या विश्वासावरती कारखान्याची धुरा माझ्या खांद्यावरती दिलेली आहे. त्यामुळे ही पालखी शेवटपर्यंत नेणं मला भाग आहे. माझं काय वाटेल ते झालं तरी चालेल, मी थांबणार नाही. जनतेच्या प्रश्नकर्ता, कारखाना अखंडित सुरू राहण्यासाठी माझ्या जीवाचं काहीही झालं तरी चालेल, पण मी मागे हटणार नाही”, अशी भावना संग्राम थोपटे यांनी व्यक्त केली.