Corona Alert : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची महाराष्ट्रात धडक ! पुण्यात आढळले 7 रुग्ण
राज्यात कोरोनाचा विषाणूच्या नव्या व्हेरिएंटने धडक दिल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट BA4 आणि BA5 चे 7 रुग्ण पुण्यात आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य खातं खडबडून जागं झालं आहे.
पुणे : देशात आणि महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Update) कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळत असतानाच आता राज्यासाठी एक चिंताजनक बातमी आलीय. राज्यात कोरोनाचा विषाणूच्या नव्या व्हेरिएंटने (Corona New Variant) धडक दिल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट BA4 आणि BA5 चे 7 रुग्ण पुण्यात आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य खातं खडबडून जागं झालं आहे. पुण्यात ओमायक्रॉनचे 2 नवे सब व्हेरिएंट BA4 चे चार आणि BA5 चे तीन रुग्ण आढळले आहेत. त्यात 4 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश आहे. त्यातील चार रुग्ण हे 50 पेक्षा जास्त वय असलेले, 2 रुग्ण 20 ते 40 मधील, तर एक रुग्ण हा 10 वर्षाखालील असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आलीय. महत्वाची बाब म्हणजे हे नवे व्हेरिएंट अधिक संसर्गजन्य (Contagious) असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केलाय. त्यामुळे सावधगिरी बाळगण्याचं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलंय. दरम्यान. आज राज्यात 529 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.
For the first time, B.A. 4 & 5 variants have been found in Maharashtra; 4 patients of B.A. 4 variants & 3 patients of B.A. 5 variants in Pune, as per the latest report of the Whole Genomic Sequencing.
— ANI (@ANI) May 28, 2022
कोरोना लसीच्या बूस्टर डोसची गरज
ओमायक्रॉनच्या BA 2 या व्हेरिएंटप्रमाणेच BA4 आणि BA5 व्हेरिएंटची लक्षणं आहे. या व्हेरिएंटचा पहिला रुग्ण तामिळनाडू तर दुसरा रुग्ण तेलंगणात आढळला होता. त्यानंतर आता महाराष्ट्रातील पुण्यात 7 रुग्ण आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. या व्हेरिएंटपासून सुरक्षित राहण्यासाठी कोरोना लसीच्या बूस्टर डोसची गरज असल्याचं इंडियन सार्स कोव्ह – 2 जिनोमिक्स कंसोर्टियमने म्हटलंय.
नवे व्हेरिएंट अधिक संसर्गजन्य, मात्र कमी घातक
ओमायक्रॉनचा BA4 आणि BA5 हे सब व्हेरिएंट जगात कोरोनाचा केसेसमध्ये मोठी वाढ होण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. 16 देशांमध्ये BA4 चे जवळपास 700 पेक्षा अधिक रुग्ण तर 17 देशात BA5 चे 300 पेक्षा अधिक रुग्ण आढळून आल्याची माहिती आहे. कोरोनाचे विषाणूचा हे नवे व्हेरिएंट अधिक संसर्गजन्य असले तरी ते घातक नसल्याचं तज्ज्ञ सांगत आहे. असं असलं तरी काळजी घेणं आणि सतर्क राहणं अधिक गरजेचं असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.